Mhada Lottery : मुंबई आणि उपनगरात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आणि कोकण मंडळाकडून मिळून तब्बल ७ हजार घरांची लॉटरी लवकरच काढण्यात येणार आहे.
यामध्ये मुंबई मंडळाकडून सुमारे ३ हजार, तर कोकण मंडळाकडून ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरात सुमारे ४ हजार घरांची सोडत निघणार आहे. बहुप्रतिक्षित या लॉटरीचे निकाल मार्च २०२६ मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता महानगरपालिका निवडणुका आणि आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडा प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती देत सोडत प्रक्रियेला वेग दिला आहे.
मुंबईसारख्या महागड्या शहरात परवडणाऱ्या घरांची मोठी गरज असून, म्हाडाची घरे ही सर्वसामान्यांसाठी नेहमीच विश्वासार्ह पर्याय ठरली आहेत.
या वर्षी मुंबई बोर्डाच्या लॉटरीअंतर्गत बीडीडी चाळ, मोतीलाल नगर, जीटीबी नगरमधील पंजाबी कॉलनी, पत्रा चाळ, अभ्युदय नगर, पूनम नगर तसेच अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश असणार आहे.
हे प्रकल्प नियोजन आणि अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांत असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरांचा साठा उपलब्ध होणार आहे.
मुंबईबरोबरच कोकण मंडळाअंतर्गत ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरात सुमारे ४ हजार घरांसाठी स्वतंत्र लॉटरी काढली जाणार आहे. त्यामुळे शहराबाहेरील घर खरेदीदारांसाठीही ही मोठी संधी ठरणार आहे.
इच्छुक अर्जदार housing.mhada.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी व अर्ज करू शकतात. म्हाडा रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधांना प्राधान्य देत असल्यामुळे त्यांच्या घरांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो.
गेल्या ७६ वर्षांच्या प्रवासात म्हाडाने महाराष्ट्रात जवळपास ९ लाख परवडणारी घरे बांधून वाटप केली आहेत. मध्यम व कमी उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी ही लॉटरी हक्काचं घर मिळवण्याची एक महत्त्वाची आणि सुवर्णसंधी ठरणार आहे.













