Mumbai Traffic : मुंबई शहरात वाढती वाहतूककोंडी आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांनी जड वाहनांच्या हालचालींवर नवे आणि कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम १ फेब्रुवारीपासून अमलात येणार असून, त्यामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
नव्या आदेशानुसार, सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या गर्दीच्या वेळेत जड वाहनांना मुंबई शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हीच वेळ शहरातील कार्यालयीन प्रवासी, शालेय वाहतूक आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी सर्वाधिक गजबजलेली असते.

या वेळेत संथ गतीने चालणाऱ्या अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी निर्माण होते तसेच अपघातांचा धोका वाढतो, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, दक्षिण मुंबई परिसरात हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. सकाळी ७ ते मध्यरात्री १२ या वेळेत लक्झरी बसेससह सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. या कालावधीत फक्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच परवानगी दिली जाणार आहे.
दक्षिण मुंबईत जड वाहनांना केवळ मध्यरात्री १२ ते सकाळी ७ या वेळेतच प्रवेश दिला जाईल. विशेष म्हणजे, प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसेसना परवानगीच्या वेळेतही दक्षिण मुंबईत प्रवेश दिला जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
याशिवाय, पूर्व मुक्त महामार्गावर (ईस्टर्न फ्रीवे) बसेस वगळता सर्व जड वाहनांवर २४ तास बंदी कायम ठेवण्यात आली आहे. या महामार्गावर वेग जास्त असल्याने जड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढू शकतो, असेही कारण देण्यात आले आहे.
तथापि, काही वाहनांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे. भाज्या, दूध, ब्रेड, बेकरी पदार्थ, पिण्याचे पाणी, पेट्रोल, डिझेल, रॉकेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, तसेच रुग्णवाहिका, शालेय बस, सरकारी आणि निमसरकारी वाहने या नियमांपासून वगळण्यात आली आहेत.
वाहतूककोंडी कमी करून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेळेत आणि आरामदायी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे. नागरिक, वाहनचालक आणि वाहतूकदारांनी या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.













