उन्हाळ्यात गारवा देणारी महाराष्ट्रातील ५ थंड हवेची ठिकाणे; सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन्स

Published on -

Maharashtra Picnic Spot : उन्हाळ्याचा पारा चढू लागला की, शहरातील उष्णता आणि धकाधकीच्या जीवनातून काही दिवस दूर जाण्याची ओढ लागते. थंड हवा, हिरवळ, धुके आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेला वेळ मनाला नवसंजीवनी देतो.

अशा वेळी महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे पर्यटकांसाठी उत्तम पर्याय ठरतात. उन्हाळी सुट्टी अविस्मरणीय करण्यासाठी महाराष्ट्रातील ही ५ सर्वोत्तम थंड हवेची ठिकाणे नक्कीच भेट द्या.

महाबळेश्वर (सातारा)

महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर ओळखले जाते. येथे आल्हाददायक वातावरण, दाट जंगल, खोल दऱ्या आणि विशाल पठार पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात.

धुक्याने वेढलेली सकाळ आणि मनमोहक सनसेट पॉईंट्स हे महाबळेश्वरचे खास आकर्षण आहे. वेण्णा लेकवर बोटिंग, ऑर्थर सीट पॉईंटवरून दिसणारी दरी, मॅप्रो गार्डनमधील पदार्थ आणि ताज्या स्ट्रॉबेरीचा स्वाद पर्यटकांना वेगळाच आनंद देतो.

लोणावळा-खंडाळा (पुणे)

सह्याद्रीच्या कुशीत वसलेली लोणावळा-खंडाळा ही जोड-शहरे नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती राहिली आहेत. पुणे आणि मुंबईजवळ असल्याने येथे सहज जाता येते. राजमाची पॉईंट, टायगर पॉईंट, भुशी डॅम आणि कार्ला-भाजे लेणी ही ठिकाणे निसर्ग व इतिहासाची सांगड घालतात.

चिखलदरा (अमरावती)

विदर्भातील कडक उन्हात गारवा देणारे एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजे चिखलदरा. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या ठिकाणी निसर्ग अजूनही निखळ स्वरूपात पाहायला मिळतो. गाविलगड किल्ला, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, भीमकुंड आणि पंचबोल पॉईंट ही प्रमुख आकर्षणे आहेत.

माथेरान (रायगड)

आशियातील एकमेव ‘ऑटोमोबाईल फ्री’ हिल स्टेशन म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. येथे वाहनांना बंदी असल्याने हवा अत्यंत शुद्ध आणि थंड असते. टॉय ट्रेनची सफर, पॅनोरमा पॉईंट, इको पॉईंट आणि घोडदौड यांचा अनुभव खास ठरतो.

पाचगणी (सातारा)

महाबळेश्वरजवळ वसलेले पाचगणी हे शिक्षणाचे माहेरघर आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखले जाते. टेबल लँड, पारसी पॉईंट आणि सिडनी पॉईंट ही ठिकाणे पाहण्यासारखी असून, पॅराग्लायडिंगसाठीही पाचगणी प्रसिद्ध आहे.

या उन्हाळ्यात उष्णतेपासून सुटका हवी असेल, तर महाराष्ट्रातील ही थंड हवेची ठिकाणे नक्कीच तुमची सुट्टी खास बनवतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe