सीएसटीएम पुनर्विकासाचा फटका; विदर्भ-मुंबई प्रवाशांसाठी पुढील तीन महिने बदले रेल्वे वेळापत्रक

Published on -

Railway News : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) येथे सुरू असलेल्या मोठ्या पुनर्विकास कामांमुळे विदर्भातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढील तीन महिन्यांपर्यंत बदललेल्या रेल्वे वेळापत्रकाचा सामना करावा लागणार आहे.

रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीमार्फत सीएसटीएम स्थानकावर पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्याचा थेट परिणाम काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर झाला आहे.

सीएसटीएमवरील फलाट क्रमांक १६ आणि १७ येथे संरचनात्मक दुरुस्ती, सिग्नल प्रणालीत सुधारणा तसेच प्रवासी सुविधांशी संबंधित महत्त्वाची कामे केली जाणार आहेत.

या कामांसाठी हे दोन्ही फलाट तब्बल ८५ दिवस बंद ठेवण्यात येणार असून, या कालावधीत येथून होणारी सर्व रेल्वे वाहतूक पूर्णपणे स्थगित राहणार आहे. ही तात्पुरती व्यवस्था १ फेब्रुवारी २०२६ पासून २६ एप्रिल २०२६ पर्यंत लागू राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांच्या टर्मिनस स्थानकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विदर्भातून मुंबईकडे येणारी गाडी क्रमांक १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक ११००२ बल्लारशहा-सीएसएमटी नांदिग्राम एक्सप्रेस या दोन्ही गाड्या सीएसटीएमऐवजी दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत.

त्यामुळे सीएसटीएमपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना दादरहून पुढील प्रवासासाठी उपनगरी रेल्वे, बस किंवा इतर वाहतूक साधनांचा आधार घ्यावा लागणार आहे.

याशिवाय फलाट क्रमांक १६ व १७ वापरणाऱ्या इतर काही लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. यामध्ये १२८१० हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस, ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, २२१४४ बीदर-सीएसएमटी एक्सप्रेस,

२२१०८ लातूर-सीएसएमटी एक्सप्रेस आणि २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या थांब्यांमध्ये आणि वेळापत्रकात आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सीएसटीएमच्या पुनर्विकासामुळे भविष्यात प्रवाशांना अधिक आधुनिक आणि सोयीस्कर सुविधा मिळणार असल्या तरी सध्या या तात्पुरत्या बदलांमुळे विशेषतः विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच आपले प्रवास नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe