Gold Rate : जागतिक बाजारातील कमकुवत कल, अमेरिकी डॉलरच्या मूल्यातील वाढ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून झालेल्या जोरदार नफावसुलीमुळे शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली.
अवघ्या एका दिवसात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १४ हजार रुपयांनी घसरला, तर चांदीचा दर प्रति किलो तब्बल २० हजार रुपयांनी कमी झाला. मागील काही सत्रांतील विक्रमी तेजी नंतर आलेली ही घसरण बाजारासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

नवी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव आज १४ हजार रुपयांनी, म्हणजेच सुमारे ७.६५ टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम १ लाख ६९ हजार रुपयांवर (सर्व करांसहित) आला. याआधी गुरुवारी (ता. २९) सोन्याचा दर १२ हजार रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १ लाख ८३ हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.
चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, आज प्रति किलो चांदीचा भाव २० हजार रुपयांनी म्हणजेच जवळपास पाच टक्क्यांनी घसरून ३ लाख ८४ हजार ५०० रुपयांवर आला. गुरुवारीच चांदीने ४ लाख ४ हजार ५०० रुपयांचा उच्चांक गाठला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंवर दबाव दिसून आला. स्पॉट सोन्याचा दर ५.३१ टक्क्यांनी किंवा २८५.३० डॉलरने घसरून ५,०८७.७३ डॉलर प्रति औंसवर आला, तर स्पॉट चांदीचा दर १२.०९ टक्क्यांनी घसरून १०१.४७ डॉलर प्रति औंसवर पोहोचला. इंट्रा-डे व्यवहारात चांदीचा दर १७.५ टक्क्यांपर्यंत घसरून ९५.२६ डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आला होता.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केविन वॉर्श यांची फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामुळे गुंतवणूकदार जोखीम टाळण्याच्या भूमिकेत गेले असून, त्याचा थेट परिणाम सोने-चांदीच्या दरांवर झाला आहे, असे कोटक सिक्युरिटीजच्या कमोडिटी रिसर्च विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा कायनात चेनवाला यांनी सांगितले.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, गेल्या अनेक सत्रांपासून सोने आणि चांदी ‘ओव्हरबॉट’ स्थितीत व्यवहार करत होती. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या घसरण अपेक्षित होती.
संस्थात्मक गुंतवणूकदारांनी नफा सुरक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याने ही घसरण अधिक तीव्र झाली आहे. आगामी काळात जागतिक संकेतांवरच सोने-चांदीच्या दरांची दिशा अवलंबून राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.













