Bank Loan News : आजच्या डिजिटल युगात सुरक्षितता आणि गोपनीयतेच्या दृष्टीने अनेक नागरिक बँक खाते, क्रेडिट कार्ड, यूपीआय आणि इतर डिजिटल व्यवहारांसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर वापरतात. मात्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर सध्या एक प्रश्न चर्चेत आहे-बँक खाते आणि क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर असल्यास कर्जाचा अर्ज अडकू शकतो का? हा प्रश्न सामान्य लोकांसाठी महत्त्वाचा ठरत आहे, कारण कर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडथळे येण्याची शक्यता वाढत आहे.
बँकिंग तज्ज्ञांच्या मते, या प्रश्नाचे उत्तर थेट ‘हो’ किंवा ‘नाही’ असे देता येत नाही. वेगवेगळे मोबाइल नंबर असणे हे स्वतःमध्ये चुकीचे नाही आणि त्यामुळे कर्ज थेट नाकारले जात नाही.

मात्र यामुळे कर्ज प्रक्रियेत पडताळणीचा कालावधी वाढू शकतो. रेडिटवरील अनेक युजर्सनी अनुभव शेअर करत सांगितले आहे की, केवायसी (KYC) अपडेट असेल आणि सर्व माहिती अचूक असेल तर कर्ज मिळण्यात मोठी अडचण येत नाही.
महत्त्वाचे म्हणजे, क्रेडिट स्कोअर मोबाइल नंबरवर अवलंबून नसतो. तो पॅन कार्ड, कर्ज परतफेडीचा इतिहास, क्रेडिट वापर आणि आर्थिक शिस्त यावर ठरतो.
त्यामुळे फक्त बँक खाते आणि क्रेडिट कार्डचे मोबाइल नंबर वेगवेगळे आहेत म्हणून क्रेडिट स्कोअर खराब होत नाही. मात्र खरी अडचण केवायसी, ओटीपी आणि ओळख पडताळणीच्या टप्प्यावर निर्माण होते.
बँका आणि एनबीएफसींना कर्ज प्रक्रिया करताना सेंट्रल केवायसी (CKYC), बँक खाते आणि क्रेडिट प्रोफाइल यांची सांगड घालावी लागते. सीकेवायसीमध्ये सहसा एकच मोबाइल नंबर नोंदलेला असतो.
जर बँक खात्यात एक नंबर, क्रेडिट कार्डमध्ये दुसरा आणि कर्ज अर्जात तिसराच नंबर दिला असेल तर सिस्टममध्ये विसंगती निर्माण होऊ शकते. यामुळे ओटीपी न मिळणे, कागदपत्रांची पडताळणी रखडणे किंवा बँकेकडून अतिरिक्त पुष्टीकरणाची मागणी होणे शक्य आहे.
याशिवाय, मोबाइल नंबर चुकीचा किंवा रिसायकल झालेला असल्यास चुकीचे कॉल, रिकव्हरी एजंट्सचे फोन आणि अनावश्यक सूचना मिळण्याची समस्या उद्भवू शकते. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, रिसायकल मोबाइल नंबरमुळे अनेक निष्पाप नागरिकांना कर्ज रिकव्हरीचे फोन आले आहेत.
तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, स्वतंत्र मोबाइल नंबर वापरणे गैर नाही; मात्र कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी बँक खाते, क्रेडिट कार्ड आणि सीकेवायसीमध्ये एकच सक्रिय मोबाइल नंबर अपडेट करणे शहाणपणाचे ठरते. यामुळे कर्ज प्रक्रिया जलद, सुलभ आणि तणावमुक्त होते.













