अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांना महागाईचा धक्का; एलपीजी गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग

Published on -

LPG Price Hike : आज १ फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा अर्थसंकल्प मांडत असताना, अर्थसंकल्पापूर्वीच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.

एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ करण्यात आली असून, विशेषतः १९ किलो वजनाच्या कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत. दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर केल्या जातात.

त्यानुसार आज १ फेब्रुवारीपासून नवीन दर लागू झाले असून, सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी सुधारित दर जाहीर केले आहेत. यामध्ये १९ किलो वजनाच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ४९ ते ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यातही एलपीजी गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. त्या वेळी १९ किलोच्या सिलेंडरवर १११ रुपयांची दरवाढ करण्यात आली होती. सलग दुसऱ्या महिन्यात दरवाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे तसेच खाद्यपदार्थ व्यवसाय करणाऱ्यांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.

आधीच वाढत्या कच्चा मालाच्या किमती आणि इतर खर्चामुळे अडचणीत असलेल्या व्यावसायिकांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे.

आजच्या नव्या दरांनुसार मुंबईत १९ किलो वजनाच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १६९२ रुपये इतकी झाली आहे. यापूर्वी ही किंमत १६४२ रुपये होती. कोलकत्यात या सिलेंडरचे दर १८४४.५० रुपयांपर्यंत वाढले आहेत. देशातील इतर महानगरांमध्येही कमर्शियल गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या दरवाढीचा कोणताही परिणाम घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर झालेला नाही. घरगुती वापरासाठी असलेल्या १४.२ किलोच्या सिलेंडरच्या किंमती सध्या स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गृहिणींना आणि सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

तथापि, सलग दोन महिन्यांपासून कमर्शियल एलपीजी गॅस महाग होत असल्याने येत्या काळात हॉटेलमधील जेवण, चहा, नाश्ता तसेच इतर खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ महागाईच्या चिंतेत आणखी भर घालणारी ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe