Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला असून, प्रथमच रविवारी अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करताना देशांतर्गत उत्पादन वाढ, आयात अवलंबित्व कमी करणे आणि सामान्य नागरिकांची क्रयशक्ती वाढवण्यावर विशेष भर दिला.
या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना’. या योजनेअंतर्गत एक जिल्हा – एक उत्पादन ही संकल्पना राबवली जाणार आहे. यामाध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिक उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे गावपातळीवर रोजगारनिर्मिती होऊन स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.

देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रावर मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 40 हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली आहे.
याशिवाय, भारताला औषधनिर्मितीचे जागतिक हब बनवण्याचा सरकारचा मानस असून, बायोफार्मा क्षेत्रासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शुगर आणि कॅन्सरसारख्या आजारांवरील औषधोपचार स्वस्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सात नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली असून, त्यामध्ये मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद या मार्गांचा समावेश आहे. तसेच देशातील जलवाहतुकीला चालना देण्यासाठी 20 नवीन जलमार्ग उभारले जाणार असून, 2047 पर्यंत जलमार्गांचा वाटा 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. देशात तीन नवीन आयुष आयुर्वेदिक कॉलेज, पाच युनिव्हर्सिटी टाऊनशिप आणि मेडिकल टुरिझमसाठी पाच हब विकसित करण्यात येणार आहेत. जामनगर येथील WHO केंद्र अधिक सक्षम केले जाणार आहे.
एकूणच, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 हा ग्रामीण विकास, उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून भारताला आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर अधिक सक्षम बनवण्याचा स्पष्ट संदेश देतो.













