Government Scheme : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प २०२६ सादर करताना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या ‘लखपती दीदी’ कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या निर्णयामुळे देशभरातील लाखो महिलांना थेट लाभ मिळणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘लखपती दीदी’ योजनेचा मुख्य उद्देश स्वयं-सहायता गटांशी (SHG) संलग्न महिलांचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपयांपर्यंत वाढवणे हा आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना केवळ विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार नाही, तर त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर सरकारचा विशेष भर राहणार आहे. यामुळे महिलांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळेल आणि त्यांचे उत्पन्न स्थिरपणे वाढण्यास मदत होईल.
अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सी-मार्ट (C-Mart) योजनेमुळे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांसाठी देशभरात अधिक किरकोळ विक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या केंद्रांमधून ग्रामीण भागातील महिलांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतील.
त्यामुळे मध्यस्थांचा खर्च कमी होऊन महिलांना चांगला दर मिळेल. ग्रामीण भागासोबतच शहरी महिलांसाठीही या उपक्रमातून रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना ५ लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या कर्जावर सरकारकडून व्याज अनुदान दिले जाणार असून, त्यामुळे महिलांवरील आर्थिक ओझे कमी होणार आहे. कमी व्याजदरामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणे किंवा आधीच सुरू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करणे अधिक सोपे होणार आहे.
‘लखपती दीदी’ योजना प्रामुख्याने ग्रामीण महिलांसाठी असून शेती, दुग्धव्यवसाय, अन्न प्रक्रिया, शिवणकाम, हस्तकला, कापड उद्योग आणि किरकोळ विक्री अशा विविध क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
१८ ते ५० वयोगटातील स्वयं-सहायता गटांशी संबंधित महिला या योजनेसाठी पात्र आहेत. ऑनलाइन अर्ज ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून, तर ऑफलाइन अर्ज स्थानिक SHG कार्यालय, ग्रामीण विकास विभाग किंवा संबंधित बँकेत करता येणार आहेत.
एकूणच अर्थसंकल्प २०२६ मधील ही घोषणा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरण्याची शक्यता असून ‘लखपती दीदी’ कार्यक्रम महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने नेणारा विश्वासार्ह मार्ग ठरत आहे.













