Ladaki Bahin Yojana : “एकनाथ शिंदे हा शब्दाचा पक्का आहे. ज्या बहिणींनी या भावावर विश्वास टाकला आहे, त्या बहिणींना लखपती केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” अशा ठाम शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे जाहीर सभेत महिलांना मोठे आश्वासन दिले.
यावेळी त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मिळणारा मासिक हप्ता सध्याच्या १५०० रुपयांवरून लवकरच २१०० रुपये करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. या घोषणेमुळे सभास्थळी उपस्थित महिलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सभेची सुरुवात भावनिक वातावरणात झाली. नुकतेच निधन झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत शिंदे म्हणाले, “अजितदादांच्या जाण्याचे दुःख मोठे आहे.
मात्र या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, त्या पुढे ढकलता येत नाहीत. त्यामुळे अत्यंत साधेपणाने आणि कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेत आम्ही प्रचार करत आहोत.”
महिला सक्षमीकरणावर भर देताना शिंदे म्हणाले, “ज्या उमेदवाराच्या पाठीशी महिला शक्ती उभी असते, त्याचा विजय निश्चित असतो. दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज तुमच्याकडे विनंती करायला आला आहे.
ही ओवाळणी लवकरच २१०० रुपये होणार आहे.” सरकारचे अंतिम ध्येय केवळ आर्थिक मदत देणे नसून विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना ‘लखपती’ बनवणे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या समर्थनार्थ बोलताना शिंदे यांनी ‘जनशक्ती विरुद्ध धनशक्ती’ अशी लढाई सुरू असल्याचे सांगितले. “सत्ता कितीही मोठी असली तरी अखेर जनता ठरवते की कोणाला आशीर्वाद द्यायचा. या लढाईत नेहमी जनशक्तीच जिंकते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या वाढत्या ताकदीचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री म्हणाले की, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार आणि एक खासदार असून, आगामी निवडणुकीत गेल्या वेळची कसर नक्कीच भरून काढली जाईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.













