Railway News : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला. मात्र या नियोजित ब्लॉकचा फटका थेट मुंबईकर प्रवाशांना बसला असून, रविवारी सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
विशेषतः ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण दरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

या कालावधीत कल्याणहून सकाळी 10.28 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद आणि अर्ध-जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आधीच मर्यादित असलेल्या सेवांवर ताण वाढला आणि लोकलगाड्या उशिराने धावू लागल्या.
या गाड्यांना नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्यात आल्याने या स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली.
रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही कामानिमित्त, तसेच प्रवासासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली, तर काही प्रवासी गर्दीमुळे स्थानकातच अडकून पडले.
दरम्यान, सीएसएमटी आणि दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात आल्याने उपनगरीय लोकलगाड्यांचे वेळापत्रक आणखीच कोलमडले.
याचा परिणाम संपूर्ण मध्य रेल्वे मार्गावर दिसून आला. अनेक लोकल गाड्या 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या.
रेल्वे प्रशासनाने हा ब्लॉक पूर्वनियोजित असल्याचे सांगत देखभाल कामे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मात्र, योग्य नियोजनाअभावी आणि अपुऱ्या पर्यायी व्यवस्थेमुळे प्रवाशांचा रोष वाढला आहे.
“मेगाब्लॉक असणार हे माहीत होते, पण इतकी मोठी गैरसोय होईल याची कल्पना नव्हती,” अशी प्रतिक्रिया अनेक मुंबईकरांनी व्यक्त केली आहे.













