Financial Planning Tips : मासिक ८०,००० रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला ५० लाख रुपयांचे डबल बेडरूम घर खरेदी करणे खरंच परवडणारे आहे का, हा प्रश्न सध्या अनेक मध्यमवर्गीयांच्या मनात आहे. वाढत्या घरांच्या किमती, दीर्घकालीन गृहकर्ज आणि आर्थिक अनिश्चितता लक्षात घेता याबाबत व्यावसायिक आर्थिक तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही व्यक्तीचा मासिक EMI हा त्याच्या एकूण पगाराच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. म्हणजेच ८०,००० रुपयांच्या पगारावर सुरक्षित EMI सुमारे २४,००० रुपयांपर्यंत असायला हवा.

मात्र, जर ५० लाखांच्या घरासाठी ४० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले, तर सध्याच्या व्याजदरानुसार मासिक EMI साधारण ३०,००० ते ३५,००० रुपयांपर्यंत जातो. एवढा EMI परवडण्यासाठी किमान १,२०,००० रुपये मासिक पगार आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे ८०,००० रुपयांच्या पगारावर असे कर्ज घेतल्यास आर्थिक ताण वाढण्याचा धोका मोठा आहे.
याशिवाय, सध्याच्या महानगरांमध्ये ५० लाख रुपयांना डबल बेडरूम (१२०० ते १३०० स्क्वेअर फूट) घर मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. अनेक शहरांमध्ये अशा घरांची किंमत सरासरी एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
मात्र, टायर-२ शहरांमध्ये किंवा लहान शहरांमध्ये ५० लाखांच्या बजेटमध्ये घर मिळण्याची शक्यता अजूनही आहे. गृहकर्ज साधारणपणे २५ ते ३० वर्षांच्या कालावधीत फेडावे लागते, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.
घर खरेदीचा विचार करताना केवळ पगारावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याकडे ५० लाख रुपये गुंतवणुकीसाठी असतील आणि ते व्याजावर दिले, तर महिन्याला सुमारे ५०,००० रुपये उत्पन्न मिळू शकते. हे उत्पन्न EMI भरण्यास मोठी आर्थिक सुरक्षा देते. नोकरी गेली तरी हे पॅसिव्ह उत्पन्न आधार ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, वय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील घर खरेदीत महत्त्वाच्या आहेत. २५ ते ३० वयात घर घेण्याऐवजी, तोच पैसा म्युच्युअल फंड, इक्विटी किंवा इतर मालमत्तांमध्ये गुंतविल्यास दीर्घकाळात अधिक संपत्ती निर्माण होऊ शकते. ४५ व्या वर्षानंतर, कुटुंब स्थिर झाल्यावर घर खरेदी करणे अधिक सुरक्षित ठरू शकते.
भाड्याने राहण्यालाही काही फायदे आहेत. उदाहरणार्थ, १० लाख रुपये व्याजावर दिल्यास महिन्याला सुमारे २०,००० रुपये मिळू शकतात आणि त्या पैशात ५० लाखांच्या घरात भाड्याने राहता येते.
यामुळे मोठी रक्कम अडकत नाही आणि EMI चा ताण कमी होतो. मात्र, भाडे दरवर्षी वाढते, तर EMI साधारणपणे ३० वर्षे स्थिर राहतो, हा फरकही लक्षात घेण्यासारखा आहे.
एकूणच, ८०,००० रुपयांच्या मासिक पगारात ५० लाखांचे घर खरेदी करणे शक्य असले तरी ते आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते. त्यामुळे घर खरेदीपूर्वी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत, दीर्घकालीन गुंतवणूक आणि वैयक्तिक आर्थिक नियोजन यांचा सखोल विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.













