Pune Police Bharti : पुणे शहराच्या वाढत्या सीमाविस्तारासह लोकसंख्येत झपाट्याने होत असलेली वाढ लक्षात घेता, पुणे पोलीस दलावरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी गृह विभागाने मोठा निर्णय घेतला असून,
प्रलंबित असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर हिरवा कंदील देण्यात आला आहे. रिक्त पदे भरण्यासाठी हालचालींना वेग आला असून, लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

सध्या पुणे शहराची सुरक्षा केवळ निम्म्या पोलीस बळावर सांभाळली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहरासाठी किमान २१ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असताना, प्रत्यक्षात केवळ सुमारे १० हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
या तब्बल ५० टक्के मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक पोलिसांना २४-२४ तास सलग कर्तव्य बजवावे लागत असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक आरोग्यावर होत आहे.
गेल्या वर्षभरात शहरात सुरक्षेच्या दृष्टीने पाच नवीन पोलीस ठाणी सुरू करण्यात आली. मात्र, आवश्यक पदभरती न झाल्याने या ठाण्यांवरही अपुरा मनुष्यबळाचा भार पडला आहे.
कामाची व्याप्ती वाढली असली तरी कर्मचारी तेवढेच असल्याने पुणे पोलिसांवरील ताण अधिकच वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी जोर धरू लागली होती.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस भरतीसाठीची मैदानी शारीरिक चाचणी अंदाजे १० ते १५ फेब्रुवारीदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. या चाचणीसाठी पुणे शहरासह राज्याच्या विविध भागांतून हजारो तरुण-तरुणी पुण्यात दाखल होणार आहेत.
उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था, चाचणीसाठीची मैदाने, तसेच पारदर्शक प्रक्रिया राबवण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.
या भरतीमुळे तीन पातळ्यांवर सकारात्मक बदल अपेक्षित आहेत. पहिला, कार्यरत पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल आणि त्यांना नियमित सुट्ट्या व निश्चित कामाचे तास मिळतील.
दुसरा, शहरातील गस्त आणि गुन्हेगारी तपासाला वेग येऊन कायदा व सुव्यवस्थेला बळकटी मिळेल. तिसरा आणि महत्त्वाचा परिणाम म्हणजे, खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.













