खाजगी वाहनांसाठी FASTag वरून ‘KYV’ अट रद्द; 1 फेब्रुवारी 2026 पासून नवीन नियम लागू

Published on -

FASTag Rules : राष्ट्रीय भारतीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) FASTag वापरकर्त्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कार, जीप आणि व्हॅनसारख्या खाजगी वाहनांसाठी लागू असलेली ‘नो युवर व्हेईकल’ म्हणजेच केव्हीवाय (KYV) ही अट आता रद्द करण्यात आली आहे.

हा बदल 1 फेब्रुवारी 2026 पासून जारी होणाऱ्या सर्व नवीन FASTag साठी लागू राहणार आहे. त्यामुळे FASTag अॅक्टिव्ह झाल्यानंतर वाहनधारकांना वेगळी केवायव्ही प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज भासणार नाही.

नवीन नियमांनुसार, FASTag अॅक्टिव्हेशनपूर्वीच वाहनांच्या तपशीलांची संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये वाहन क्रमांक, श्रेणी आणि इतर आवश्यक माहिती आधीच तपासली जाईल.

त्यामुळे अॅक्टिव्हेशननंतर केवायव्ही करण्याचा पर्याय पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. एनएचएआयच्या मते, या निर्णयामुळे FASTag वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी होतील.

पूर्वी अनेक FASTag वापरकर्त्यांना सर्व कागदपत्रे योग्य असूनही केवायव्ही अपूर्ण असल्याचे संदेश येत होते. यामुळे टोल प्लाझावर अडथळे निर्माण होत होते तसेच बँकांकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. या त्रासाला पूर्णविराम देण्यासाठीच अॅक्टिव्हेशननंतरची केवायव्ही अट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या वाहनांवर आधीपासून FASTag आहे, त्यांच्यासाठी केवायव्ही करणे बंधनकारक असणार नाही. केवळ तक्रार आल्यासच तपासणी केली जाईल.

चुकीची वाहन श्रेणी, डुप्लिकेट FASTag, खराब किंवा लूज FASTag तसेच संशयास्पद गैरवापर अशा तक्रारी असल्यासच केवायव्ही तपासणी होणार आहे. अन्यथा विद्यमान FASTag पूर्ववत सक्रिय राहतील.

नवीन प्रक्रियेत वाहन पडताळणी अनिवार्य करण्यात आली असून ती ‘वाहन’ डेटाबेसद्वारे केली जाईल. जर या डेटाबेसमध्ये माहिती उपलब्ध नसेल, तर वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) वापरून पडताळणी केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय FASTag अॅक्टिव्ह केला जाणार नाही.

ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही माध्यमातून FASTag घेतला तरीही, जारी करणाऱ्या बँकांवर अॅक्टिव्हेशनपूर्वी वाहन पडताळणीची संपूर्ण जबाबदारी असेल.

एनएचएआयच्या मते, या बदलामुळे FASTag संदर्भातील तक्रारी कमी होतील आणि टोल वसुली प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक बनेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe