Electric Car : जगभरातील ऑटोमोबाईल उद्योग झपाट्याने बदलत असून, पर्यावरणपूरक आणि सस्टेनेबल तंत्रज्ञानावर अधिक भर दिला जात आहे. पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार वाढत असतानाच, आता कार स्वतःच सूर्यप्रकाशातून ऊर्जा निर्माण करू शकते का, यावरही प्रयोग सुरू झाले आहेत.
याच दिशेने एक मोठे पाऊल टाकत जपानची दिग्गज वाहन उत्पादक कंपनी Nissan ने आपल्या ऑल-इलेक्ट्रिक SUV Ariya चा एक खास Solar Concept सादर केला आहे.

Nissan Ariya Solar Concept ही अशी इलेक्ट्रिक कार आहे जी थेट सूर्यप्रकाशातून चार्ज होऊ शकते. या कारमध्ये छत, बोनट आणि मागील भागावर मिळून जवळपास 41 वर्गफूट क्षेत्रफळात सोलर पॅनल्स बसवण्यात आले आहेत.
हे सोलर पॅनल सूर्यकिरणांना विद्युत ऊर्जेत रूपांतरित करून कारची बॅटरी चालू असतानाच चार्ज करतात. विशेष म्हणजे, या तंत्रज्ञानामुळे कारला सुमारे 200 किलोमीटरपर्यंत अतिरिक्त रेंज मिळू शकते, असा दावा निसानकडून करण्यात आला आहे.
या संकल्पनेतील सर्वात आकर्षक बाब म्हणजे हे सोलर पॅनल्स बाहेरून दिसतही नाहीत. कारच्या बॉडीमध्ये ते इतक्या कौशल्याने बसवण्यात आले आहेत की, डिझाइन किंवा एअरोडायनॅमिक्सवर कोणताही परिणाम होत नाही.
ही टेक्नॉलॉजी निसानने नेदरलँड्समधील IM Efficiency या कंपनीच्या सहकार्याने विकसित केली आहे. त्यामुळे ही कॉन्सेप्ट कार दिसायला जवळपास प्रोडक्शन-रेडी Ariya सारखीच भासते.
निसानचा हा प्रयोग भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण, कार पार्क केलेली असो किंवा चालू स्थितीत असो, बॅटरी सतत चार्ज होत राहिल्यास ‘रेंज अॅन्झायटी’ मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. शहरी भागात रोजच्या वापरासाठी ही टेक्नॉलॉजी गेम-चेंजर ठरू शकते.
सध्या Nissan Ariya ही कंपनीची प्रीमियम इलेक्ट्रिक SUV असून, ती 63 kWh ते 87 kWh बॅटरी क्षमतेसह येते. एका चार्जवर ती सुमारे 600 किलोमीटरपर्यंत रेंज देते.
यामध्ये e-4ORCE ऑल-व्हील ड्राइव्ह, आलिशान इंटीरियर, ड्युअल 12.3-इंच डिजिटल स्क्रीन, लेव्हल-2 ADAS आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत.
भारतामध्ये Ariya ची टेस्टिंग यापूर्वीच पाहायला मिळाली आहे. भविष्यात ही कार भारतात लॉन्च झाल्यास तिची किंमत अंदाजे 60 ते 80 लाख रुपये असू शकते. जर सोलर पॅनल टेक्नॉलॉजी प्रोडक्शन मॉडेलपर्यंत पोहोचली, तर भारतीय ईव्ही बाजारासाठी ही कार नक्कीच एक मोठी क्रांती ठरू शकते.













