MHADA News : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील एकूण १२० घरे ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ (First Come First Serve) या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही घरे यापूर्वी लॉटरीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आली होती, मात्र विविध कारणांमुळे ती रिक्त राहिली होती. आता हीच घरे थेट विक्रीसाठी खुली करण्यात येत आहेत.
म्हाडाने अधिकृतपणे घरांच्या किंमती जाहीर केलेल्या नसल्या तरी उपलब्ध माहितीनुसार घरांची किमान किंमत सुमारे ३१ लाख रुपये असून कमाल किंमत तब्बल ८ कोटी रुपये आहे. सर्वाधिक किंमतीची घरे मुंबईतील ताडदेव परिसरात आहेत. यामुळे मध्यमवर्गीयांसोबतच उच्च उत्पन्न गटातील नागरिकांनाही या योजनेत संधी मिळणार आहे.

या घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक नागरिकांना प्रथम वेबसाइटवर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
त्यानंतर ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणे आणि योजना अथवा घर निश्चिती करण्याची प्रक्रिया १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल.
अनामत रक्कम भरल्यानंतर अर्जदारास ‘बुक माय होम’ हा पर्याय उपलब्ध होईल. त्यामध्ये विंग किंवा इमारत क्रमांक, घर क्रमांक तसेच मजल्याची माहिती दिलेली असेल. उपलब्ध घरांपैकी इच्छित घर अर्जदार निवडू शकतो.
घर निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत घराच्या विक्री किमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा करणे अनिवार्य आहे. निर्धारित वेळेत भरणा न केल्यास त्या घरावरील अर्जदाराचा दावा आपोआप रद्द होणार आहे.
१० टक्के रक्कम प्राप्त झाल्यानंतर म्हाडाकडून अर्जदारास तात्पुरते देकारपत्र (Provisional Offer Letter) ऑनलाइन पद्धतीने देण्यात येईल. त्यानंतर ९० दिवसांच्या आत उर्वरित संपूर्ण रक्कम भरणे आवश्यक आहे.
गरज भासल्यास व्याजासह जास्तीत जास्त ९० दिवसांची मुदतवाढ मिळू शकते. मात्र त्यानंतरही भरणा न केल्यास कोणतेही कारण न देता घराची वाटणी रद्द केली जाईल.
म्हाडाने स्पष्टपणे सांगितले आहे की या योजनेसाठी कोणतेही प्रॉपर्टी एजंट किंवा दलाल नेमलेले नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी अनधिकृत व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नयेत. कोणीही म्हाडाच्या नावाने फसवणूक करत असल्यास तात्काळ म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत कांदिवली, वडाळा, पवई, मालाड, घाटकोपर, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन आणि अंधेरी (पश्चिम) अशा विविध भागांतील घरे विक्रीसाठी उपलब्ध असून, मुंबईकरांसाठी घराचे स्वप्न पूर्ण करण्याची ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.













