पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्यासाठी महाराष्ट्रात लाभार्थ्यांची संख्या वाढली; हप्ता कधी मिळणार याबाबत उत्सुकता

Published on -

Pm Kisan Yojana : केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत २२ व्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. वार्षिक ६ हजार रुपये मानधन देणाऱ्या या योजनेच्या २२ व्या हप्त्यासाठी राज्यातील तब्बल ९१ लाख १६ हजार १६४ शेतकरी पात्र ठरले आहेत.

याआधी २१ व्या हप्त्यासाठी ९० लाख ४१ हजार २४१ शेतकरी पात्र होते. त्यामुळे या हप्त्यात ७४ हजार ९२३ शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला होता.

त्यानंतर आता २२ व्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या हप्त्यावेळी सुमारे अडीच लाख संशयित लाभार्थ्यांची पडताळणी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली होती.

या संशयित लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे पाठवण्यात आली असून, त्यांची पुनः पडताळणी केली जात आहे. या पडताळणीदरम्यान प्राप्तिकर मर्यादा ओलांडणारे शेतकरी,

एकाच कुटुंबात पती व पत्नी दोघेही लाभ घेत असल्याच्या प्रकरणांमध्ये एका व्यक्तीला लाभ देणे, तसेच ई-केवायसीची पूर्तता आदी निकष तपासले जात आहेत.

पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांचा नव्याने यादीत समावेश केला जात असल्याने अंतिम निधी वितरणाच्या तारखेपर्यंत लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २२ वा हप्ता नेमका कधी मिळणार, याबाबत राज्यभर चर्चा सुरू आहे. यापूर्वी जानेवारीअखेर हा हप्ता दिला जाईल, असे बोलले जात होते.

मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. सात फेब्रुवारीपूर्वी हा निधी देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात असली तरी अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

२२ व्या हप्त्यासाठी सर्वाधिक लाभार्थी असलेले जिल्हे पाहता, अहमदनगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून येथे ५ लाख २५ हजार २७६ शेतकरी पात्र ठरले आहेत.

त्याखालोखाल सोलापूर (४ लाख ९२ हजार ४४१), कोल्हापूर (४ लाख ६४ हजार ८५०), सातारा (४ लाख ३८ हजार ६५४) आणि पुणे (४ लाख ३३ हजार ७०३) या जिल्ह्यांचा समावेश आहे. पीएम किसान योजनेचा हा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News