Shetkari Karjmafi Yojana : महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी दोन मोठी विधाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकत्याच झालेल्या दोन वेगवेगळ्या सभांमध्ये केली आहेत. कर्जमाफी आणि मोफत वीज पुरवठा या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुती सरकारकडून लवकरच ठोस निर्णय होण्याची शक्यता यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.
धाराशिव जिल्ह्यातील येणेगुर गावात आयोजित सभेत बोलताना मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार कटिबद्ध असल्याचे ठामपणे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, मध्यमवर्गीय आणि गरीब शेतकऱ्यांच्या कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी कर्जमाफी केली जाईल.

मात्र, या योजनेचा लाभ फक्त खऱ्या अर्थाने शेती करणाऱ्या, वर्षानुवर्षे शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळेल. फार्महाऊस मालक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकरी या योजनेच्या कक्षेत येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट संकेत दिले.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, अनेक शेतकरी गेली ३० ते ४० वर्षे शेती करत असूनही कर्जाच्या चक्रातून बाहेर पडू शकलेले नाहीत. कर्जावर व्याज आणि त्या व्याजावर पुन्हा अतिरिक्त शुल्क अशी साखळी सुरू राहिल्याने त्यांची आर्थिक स्थिती अधिकच खालावली आहे.
याच तणावातून काही शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकार शेतकऱ्यांना असे पाऊल उचलू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी दिला.
दरम्यान, उमरगा-लोहारा तालुक्यातील कोराळ मोड येथे झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोफत वीज पुरवठ्याची घोषणा केली.
केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार राहिल्यास ‘लाडकी बहीण’ योजना सुरूच राहील, तसेच ‘लखपती दीदी’सारख्या महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस वीज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असून, यामुळे शेती उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या दोन्ही वक्तव्यांमुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण असले तरी, या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी संघटना आणि विरोधकांकडूनही सरकारकडे ठोस निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













