Upcoming SUV : तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फेब्रुवारी 2026 हा महिना तुमच्यासाठी खास ठरणार आहे. जानेवारीत टाटा मोटर्स, महिंद्रा यांसह अनेक कंपन्यांनी नवीन मॉडेल्स सादर केल्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये कार बाजारात खऱ्या अर्थाने धमाका होणार आहे.
या महिन्यात वेगवेगळ्या सेगमेंटमधील एकापेक्षा जास्त गाड्या लाँच होणार असून, यामध्ये फुल-साइज SUV, प्रीमियम लक्झरी SUV, कॉम्पॅक्ट 7-सीटर MPV आणि फेसलिफ्ट मॉडेल्सचा समावेश आहे.

JSW MG मोटर इंडिया 12 फेब्रुवारी रोजी आपली बहुप्रतिक्षित आणि सर्वात शक्तिशाली SUV MG मॅजेस्टर लाँच करणार आहे. ही SUV आकारमानाच्या बाबतीत सेगमेंटमधील सर्वात मोठी असल्याचे सांगितले जात असून, ती थेट टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देईल. आक्रमक डिझाइन, बोल्ड एक्सटीरियर, प्रीमियम इंटिरियर आणि अत्याधुनिक फीचर्स ही मॅजेस्टरची खास वैशिष्ट्ये असतील.
लक्झरी SUV सेगमेंटमध्ये BMW India 16 फेब्रुवारी रोजी BMW X3 30 xDrive M Sport Pro लाँच करणार आहे. 2.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन, माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी, 258 बीएचपी पॉवर आणि 400 एनएम टॉर्कसह ही SUV मर्सिडीज-बेंझ GLC, ऑडी Q5 आणि व्होल्वो XC60 यांना थेट आव्हान देईल.
निसान इंडिया देखील फेब्रुवारीमध्ये आपली नवीन ग्रेव्हिट (Gravite) 7-सीटर MPV लाँच करू शकते. CMF-A+ प्लॅटफॉर्मवर आधारित ही कार पेट्रोल आणि CNG पर्यायांसह येण्याची शक्यता आहे. कॉम्पॅक्ट MPV सेगमेंटमध्ये तिची थेट टक्कर मारुती सुझुकी अर्टिगाशी होईल.
याशिवाय, Skoda Kushaq Facelift ची किंमत फेब्रुवारीमध्ये जाहीर होण्याची शक्यता असून, अधिक प्रीमियम लूक आणि सुधारित फीचर्ससह ही SUV ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोससाठी मोठे आव्हान ठरू शकते. तसेच, Volkswagen Tyrone R-Line ही प्रीमियम 7-सीटर SUV देखील फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारात दाखल होणार आहे.
एकूणच, फेब्रुवारी 2026 हा महिना कारप्रेमींसाठी उत्साहाने भरलेला असणार असून, प्रत्येक बजेट आणि गरजेनुसार नवीन पर्याय उपलब्ध होणार आहेत.













