Pune News : पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे आणि मुंबई दरम्यान रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर आता तोडगा निघणार आहे.
प्रवाशांची वर्षानुवर्षांची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) हिंजवडी ते मुंबई थेट बस सेवा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांचा किमान ६० ते ९० मिनिटांचा प्रवास वेळ वाचणार असल्याचा अंदाज आहे.

सध्या मुंबईकडे जाणाऱ्या शिवनेरी आणि शिवाई बसेस स्वारगेट किंवा पुणे स्टेशन येथून सुटतात. या बसेसना वाकड हायवेपर्यंत पोहोचण्यासाठी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील प्रचंड वाहतूक कोंडीतून जावे लागते.
परिणामी प्रवाशांचे दीड ते दोन तास केवळ शहरातच अडकून जातात. मात्र, हिंजवडीतून थेट बस सुटल्यास ती त्वरित महामार्गाला जोडली जाणार असून वाकडच्या कुप्रसिद्ध ट्रॅफिक जॅमला अक्षरशः ‘बाय-बाय’ म्हणता येणार आहे.
या सेवेचा सर्वाधिक फायदा आयटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. हिंजवडी परिसरातून थेट दादर, बोरीवली आणि ठाणे या प्रमुख मुंबई स्थानकांसाठी बस उपलब्ध होणार असल्याने स्वारगेटपर्यंत जाण्याची कसरत संपणार आहे.
यामुळे प्रवास अधिक सोपा, जलद आणि आरामदायी ठरेल. आगामी हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ सुरू झाल्यानंतर या बस स्थानकांपर्यंत पोहोचणे आणखी सोयीचे होणार आहे.
पर्यावरणपूरक प्रवासालाही प्राधान्य देण्यात येणार असून हिंजवडीत विशेष चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. यामुळे ई-शिवनेरी आणि ई-शिवाई इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. प्रदूषणात घट होण्यासोबतच प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ मिळेल.
पुणे विभागाचे नियंत्रक अरुण सिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवेचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला असून पुढील काही महिन्यांतच ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गांवर जास्त फेऱ्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूणच, हिंजवडी–मुंबई थेट बस सेवा सुरू झाल्यास पुणेकरांचा मुंबईचा प्रवास अधिक सुकर, वेगवान आणि तणावमुक्त होणार आहे.













