मुंबईत ३० लाखांत घराचं स्वप्न तूर्तास रखडले; म्हाडाच्या १२० सदनिकांच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेला स्थगिती

Published on -

Mhada News : मुंबईतील घर खरेदीसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर जाहीर केलेल्या मुंबईतील १२० सदनिकांच्या विशेष योजनेला अचानक स्थगिती दिली आहे.

ही योजना ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी खुली होणार होती. मात्र, ऐनवेळी तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असल्याचं स्पष्टीकरण म्हाडाकडून देण्यात आलं आहे.

या योजनेअंतर्गत मुंबईतील विविध ठिकाणी सुमारे ३० लाख रुपयांच्या आसपास घर मिळण्याची संधी उपलब्ध होणार होती. त्यामुळे मध्यमवर्गीय व निम्न-मध्यमवर्गीय नागरिकांमध्ये या योजनेबाबत मोठी उत्सुकता होती.

मात्र, अचानक स्थगिती मिळाल्याने अनेक इच्छुक अर्जदारांचा हिरमोड झाल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध वर्तमानपत्रांमध्ये या योजनेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

म्हाडाच्या अधिकृत माहितीनुसार, संकेतस्थळावरील तांत्रिक समस्यांमुळे ५ फेब्रुवारी रोजी या योजनेची सविस्तर जाहिरात आणि माहिती पुस्तिका अपलोड करता आली नाही.

त्यामुळे अर्ज नोंदणी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या योजनेची नवीन तारीख व वेळ लवकरच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान, अर्जदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत घोषणांकडेच लक्ष द्यावे, असं आवाहन म्हाडाने केलं आहे.

या योजनेसाठी अर्ज केवळ https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच स्वीकारले जाणार असून, इतर कोणत्याही वेबसाईटवरून अर्ज करता येणार नाही.

या योजनेत अँटॉप हिल (३५), तुंगा-पवई (४४), शिंपोली कांदिवली (८), जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम (७), भायखळा (६), ताडदेव (६), लोअर परळ (४), चारकोप सेक्टर-८ (२), पीएमजीपी मानखुर्द (१), मालवणी (१), गायकवाड नगर मालवणी (१), घाटकोपर पूर्व (२), कन्नमवार नगर (१) आणि सायन (२) या भागांमध्ये सदनिका उपलब्ध होणार होत्या.

आता नवीन तारखेची घोषणा कधी होते, याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News