दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये प्रथमच ‘एआय’ सीसीटीव्ही; कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासन सज्ज

Published on -

Board Exam : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये यंदा अत्यंत कडक आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. परीक्षांमध्ये कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, यावर्षी प्रथमच परीक्षा केंद्रांवर ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा दक्षता समितीच्या आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीत परीक्षा काळात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेण्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले.

यंदा महसूल विभागासह एकूण १०६ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, ही पथके अचानक तपासणी करून परीक्षा केंद्रांवरील परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत.

परीक्षेदरम्यान कॉपी, मोबाईलचा वापर किंवा इतर कोणतेही गैरप्रकार आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर तसेच त्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाने याबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदाच्या परीक्षांमध्ये तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे परीक्षा हॉलमधील प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवतील.

एखादा विद्यार्थी संशयास्पद हालचाल करताना, कॉपी करताना किंवा मोबाईलचा वापर करताना आढळल्यास ही प्रणाली त्वरित ‘रेड फ्लॅग’ अलर्ट मुख्य नियंत्रण कक्षाला किंवा संबंधित पर्यवेक्षकाला पाठवणार आहे.

विशेष म्हणजे, परीक्षा हॉलमधील कुजबुज, आवाज किंवा बाहेरून होणाऱ्या हस्तक्षेपावरही ही प्रणाली लक्ष ठेवणार असल्याने गैरप्रकार रोखणे अधिक सुलभ होणार आहे.

जिल्ह्यातील एकूण १०३ परीक्षा केंद्रांवर ४५,२४७ विद्यार्थी दहावी आणि बारावीची परीक्षा देणार आहेत. यापैकी ७ दहावीची आणि ६ बारावीची केंद्रे ‘उपद्रवी’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या संवेदनशील केंद्रांवर स्थानिक कर्मचाऱ्यांऐवजी बाहेरील अनुदानित शाळांमधील अनुभवी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्व उपाययोजनांमुळे यंदाच्या दहावी–बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News