Mumbai Local Train : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण–ठाणे–CSMT हा देशातील सर्वाधिक गर्दीचा उपनगरीय मार्ग म्हणून ओळखला जातो. दररोज सकाळच्या पीक अवर्समध्ये कार्यालयीन वेळेमुळे प्रवाशांची अक्षरशः लोंढेच्या लोंढे लोकल स्थानकांवर दिसतात.
अशा वेळी एखादी लोकल जरी काही मिनिटे उशिराने धावली, तरी त्याचा थेट परिणाम संपूर्ण वेळापत्रकावर होऊन परिस्थिती अधिकच बिकट होते. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे.

उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस गाड्या अनेकदा उपनगरीय मार्गावर लोकल सेवेत अडथळे निर्माण करतात. सुरक्षिततेच्या कारणास्तव या एक्सप्रेस गाड्या उपनगरातील स्थानकांजवळून जात असताना लोकल गाड्यांना सिग्नलवर थांबवावे लागते.
परिणामी, लोकल उशिराने धावतात आणि डब्यांमध्ये प्रचंड गर्दी उसळते. याचा सर्वाधिक फटका सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाला बसतो. काही वेळा लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याने संपूर्ण पीक अवरचे नियोजन कोलमडते.
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे की पीक अवर्सदरम्यान लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना थेट मुंबई उपनगरात प्रवेश दिला जाणार नाही. सकाळी ५ नंतर उपनगरात पोहोचणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना टिटवाळा, आसनगावसारख्या स्थानकांपूर्वीच थांबवण्यात येणार आहे. पीक अवर संपल्यानंतरच या गाड्यांना पुढील प्रवासासाठी मार्ग मोकळा करून दिला जाईल.
विशेषतः हिवाळ्यात उत्तर भारतात पडणाऱ्या दाट धुक्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या अनेक तास उशिराने धावतात आणि थेट सकाळच्या गर्दीच्या वेळेत मुंबईत दाखल होतात. नव्या नियमानुसार अशा विलंबित गाड्यांमुळे लोकल सेवेला होणारा खोळंबा टाळता येणार आहे.
या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना काहीसा विलंब सहन करावा लागणार असला, तरी दररोज लाखो लोकल प्रवाशांना वेळेवर, अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेचा हा निर्णय उपनगरीय प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.













