सोलापुरात २२,८०० रेशन कार्डधारकांचा लाभ बंद होण्याची शक्यता; मिशन पडताळणीला वेग

Published on -

Ration Card News : रेशन कार्ड हे सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे शासकीय कागदपत्र मानले जाते. रेशन कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रत्येकी ५ किलोपर्यंत अन्नधान्य मोफत दिले जाते. मात्र सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक बाब समोर आली असून तब्बल २२,८०० लाभार्थ्यांनी गेल्या एक वर्षापासून रेशनचे धान्यच उचललेले नाही. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘मिशन पडताळणी’ मोहीम हाती घेतली आहे.

या मोहिमेअंतर्गत पुरवठा निरीक्षक, तलाठी आणि संबंधित यंत्रणांमार्फत लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, अनेक रेशन कार्डधारकांची आर्थिक परिस्थिती आता सुधारली असून त्यांना मोफत धान्याची गरज उरलेली नाही.

काही लाभार्थी रोजगार, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे दुसऱ्या शहरात अथवा राज्यात स्थलांतरित झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या नावावर सुरू असलेला रेशनचा लाभ नियमबाह्य ठरत असल्याने तो बंद केला जाणार आहे.

याशिवाय आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंकिंगच्या वेळी मोठ्या प्रमाणात तांत्रिक व मानवी चुका झाल्याचेही समोर आले आहे. अनेक ठिकाणी रेशन दुकानदारांनी अंदाजाने जन्मतारखा नोंदवल्याने काही लाभार्थ्यांचे वय खूप जास्त दाखवले गेले,

तर काहींचे वय १८ वर्षांखालील असल्याचे नोंदले गेले आहे. या गोंधळामुळे पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवताना अडचणी निर्माण झाल्या असून याची सखोल पडताळणी केली जाणार आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ज्या रेशन कार्डधारकांनी सलग सहा ते बारा महिन्यांपर्यंत अन्नधान्याचा लाभ घेतलेला नाही, अशा सर्व प्रकरणांची तपासणी होणार आहे.

यामध्ये अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड कायमचे रद्द केले जाईल. तसेच पत्ते बदलूनही माहिती अद्ययावत न केलेल्या लाभार्थ्यांचाही लाभ बंद होण्याची शक्यता आहे.

या कारवाईमुळे खरोखर गरजू आणि पात्र कुटुंबांपर्यंत अन्नधान्य पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, नागरिकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत आणि पडताळणी प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News