Maharashtra News : पुणे, सोलापूरसह राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार आज, बुधवार 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी थांबणार आहे. प्रचाराचा कालावधी आज रात्री 10 वाजता संपुष्टात येणार असून शनिवारी, 7 फेब्रुवारी रोजी संबंधित ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकांची मतमोजणी सोमवारी होणार आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने संबंधित 12 जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालये तसेच सर्व शासकीय कार्यालयांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा शासन निर्णय अधिकृतरीत्या जारी करण्यात आला असून प्रशासनाकडून अंमलबजावणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी निवडणूक होणाऱ्या 12 जिल्ह्यांमध्ये सलग तीन दिवस मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्योग, खासगी कंपन्या आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही शनिवारी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, कामगार आणि खाण विभागाच्या आदेशानुसार 18 वर्षांवरील सर्व नोंदणीकृत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असून मालकांनी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आवश्यक सवलत देणे बंधनकारक आहे.
मतदानाच्या दिवशी ज्या ठिकाणी कर्मचारी नोंदणीकृत मतदार असतील, त्यांना भरपगारी रजा देणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच या 12 जिल्ह्यांतील मतदार जर इतर जिल्ह्यांमध्ये काम करत असतील, तरी त्यांनाही मतदानासाठी सुट्टी देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
हा निर्णय उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना लागू असून त्यामध्ये कारखाने, खासगी कंपन्या, दुकाने, व्यावसायिक प्रतिष्ठाने, निवासी हॉटेल्स, भोजनालये, थिएटर, औद्योगिक युनिट्स, आयटी कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेल आउटलेट्स यांचा समावेश आहे.
या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेच्या 73 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 146 गणांसाठी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेसाठी 299, तर पंचायत समितीसाठी 528 उमेदवार रिंगणात असून एकूण 29 लाख 72 हजार 359 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचारावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.













