एअरटेल प्रीपेड ग्राहकांना मोठा झटका! इंटरनॅशनल रोमिंग पॅक थेट ९९९ रुपयांनी महागला

Published on -

Airtel Tariff Hike : एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारती एअरटेलने आपल्या एका लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या किमतीत थेट ९९९ रुपयांची वाढ केली आहे.

त्यामुळे हा प्लॅन जवळपास २५ टक्क्यांनी महाग झाला असून, २०२६ मधील एअरटेलची ही पहिलीच दरवाढ मानली जात आहे. कंपनीने हळूहळू रिचार्ज प्लॅनच्या दरांमध्ये बदल करण्यास सुरुवात केल्याचे संकेत यावरून मिळत आहेत.

एअरटेलने ज्या प्लॅनची किंमत वाढवली आहे, तो ग्लोबल इंटरनॅशनल रोमिंग प्रीपेड पॅक आहे. यापूर्वी या प्लॅनची किंमत ४,००० रुपये होती. मात्र आता हा प्लॅन ४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

ही नवी किंमत एअरटेलच्या अधिकृत पोर्टलवर सूचीबद्ध करण्यात आली असून, टेलिकॉम टॉक या वेबसाइटने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, या दरवाढीबाबत एअरटेलकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

४,९९९ रुपयांचा हा इंटरनॅशनल रोमिंग पॅक ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो. परदेशात वारंवार किंवा दीर्घकाळ प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन उपयुक्त मानला जातो.

या पॅकमध्ये आंतरराष्ट्रीय रोमिंगदरम्यान ५ जीबी डेटा, भारत आणि स्थानिक नेटवर्कसाठी १०० मिनिटे इनकमिंग व आउटगोइंग कॉल्स, १०० आउटगोइंग एसएमएस आणि मोफत इनकमिंग एसएमएसचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे, हा प्लॅन भारतात असतानाही अनेक फायदे देतो. भारतात वापराच्या वेळी या रिचार्जमध्ये रोमिंगसह अमर्यादित कॉलिंग, दररोज १.५ जीबी हाय-स्पीड डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. त्यामुळे हा प्लॅन फक्त परदेशातच नव्हे, तर देशांतर्गत वापरासाठीही फायदेशीर ठरतो.

एअरटेलने हा प्लॅन गेल्या वर्षी एप्रिल २०२५ मध्ये ४,००० रुपयांना लाँच केला होता. आता थेट ९९९ रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या तरी एअरटेलने फक्त या एकाच प्रीपेड इंटरनॅशनल रोमिंग पॅकची किंमत वाढवली आहे. मात्र, आगामी काळात इतर प्लॅनच्या किमतीही वाढण्याची शक्यता ग्राहकांकडून वर्तवली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe