मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा दिलासा; रखडलेले तीन हप्ते एकत्र मिळणार, ४५०० रुपये खात्यात जमा होणार

Published on -

Ladaki Bahin Yojana : महायुती सरकारकडून महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही योजना सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात दिली जाते. मात्र ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे हप्ते रखडले होते. अशा महिलांसाठी आता मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, ई-केवायसीच्या तांत्रिक अडचणींमुळे ज्यांना लाभ मिळाला नाही, अशा पात्र महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे एकत्रित ४,५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महायुती सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. मात्र नेटवर्क समस्या, तांत्रिक त्रुटी किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे अनेक महिलांचे अर्ज प्रलंबित राहिले. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही हप्ता मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महिला व बालविकास विभागाने विशेष पडताळणी मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत अंगणवाडी सेविका व कर्मचारी घरोघरी जाऊन लाभार्थी महिलांची पडताळणी करणार आहेत. अर्ज पात्र असूनही लाभ न मिळालेल्या महिलांची माहिती गोळा करून त्यांची छाननी केली जाणार आहे.

ई-केवायसी पूर्ण असूनही तांत्रिक अडचणीत अडकलेल्या सर्व अर्जांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, सरकारने लाडकी बहीण योजनेतील मासिक रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याची घोषणा यापूर्वीच केली होती.

याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, अर्थ खात्याच्या जबाबदाऱ्या निश्चित झाल्यानंतर या प्रस्तावावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल. त्यामुळे भविष्यात महिलांना अधिक आर्थिक मदत मिळण्याची दाट शक्यता असून, लाडकी बहीण योजना महिलांसाठी अधिक लाभदायक ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe