ST Bus Travel : महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटीची ‘लालपरी’ आता प्रवाशांच्या खिशाला अधिक चटका देणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या सर्व प्रकारच्या बस सेवांसाठी सरासरी २ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला असून, त्यावर आज (शुक्रवारी) अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडणार आहे.
सध्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या ग्रामीण आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी ही भाडेवाढ नवा आर्थिक बोजा ठरणार आहे.
एसटी ही राज्यातील ग्रामीण भागासाठी कणा मानली जाते. शाळकरी विद्यार्थी, कामगार, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी एसटीचा प्रवास अत्यावश्यक आहे. त्यामुळे भाडेवाढीचा फटका मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांनाच बसणार आहे.
एसटी महामंडळाकडून मात्र या भाडेवाढीमागे वाढता खर्च कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे.
त्याचबरोबर जुन्या बसची देखभाल, सुटे भाग, टायर, इंजिन दुरुस्ती आणि मनुष्यबळावरील खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे महामंडळाचा आर्थिक तोटा वाढत चालला असून, तो काही अंशी भरून काढण्यासाठी भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे मत अधिकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे ही २ टक्के भाडेवाढ केवळ साध्या एसटी बसपुरती मर्यादित नसणार आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या ‘यशवंत’ आणि ‘हिरकणी’ बसपासून ते लांब पल्ल्याच्या ‘शिवनेरी’, ‘अश्वमेध’ तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बस सेवांचाही यात समावेश आहे. त्यामुळे सर्व प्रवासी वर्गावर या निर्णयाचा परिणाम होणार आहे.
सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यास, पुढील ४८ तासांत नवे भाडे दर लागू होऊ शकतात. दरवर्षी टप्प्याटप्प्याने अल्प वाढ करण्याचे धोरण अवलंबले जात असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत. मात्र, वाढत्या महागाईच्या काळात एसटी भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.













