Indian Car Market : २०२६ हे वर्ष भारतीय ऑटोमोबाईल बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यावर्षी सुमारे ९ लोकप्रिय कार आणि एसयूव्हींना मोठा मिड-लाइफ अपडेट मिळणार असून,
टाटा, महिंद्रा, स्कोडा, ह्युंदाई, फोक्सवॅगन आणि मारुती सुझुकी यांसारख्या दिग्गज कंपन्या आपल्या बेस्ट-सेलिंग मॉडेल्समध्ये मोठे बदल करणार आहेत. या अपडेट्समुळे डिझाइन, फीचर्स आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत ग्राहकांना अधिक प्रीमियम अनुभव मिळणार आहे.

टाटा मोटर्स पुढील काही महिन्यांत अपडेटेड पंच ईव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये नेक्सॉन ईव्हीसारखा 45 kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता असून, तो पूर्ण चार्जमध्ये 450 किमीपेक्षा जास्त रेंज देऊ शकतो. याशिवाय 25 kWh आणि 35 kWh बॅटरी पर्यायही कायम ठेवले जातील. नव्या पंच ईव्हीमध्ये मोठी टचस्क्रीन, प्रीमियम साउंड सिस्टम, नवीन सीट फॅब्रिक आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स अपेक्षित आहेत.
महिंद्राची लोकप्रिय Scorpio N देखील फेसलिफ्ट अवतारात येणार आहे. 2026 Scorpio N फेसलिफ्ट सध्या अंतिम चाचणी टप्प्यात असून, यामध्ये फ्रंट डिझाइनमध्ये मोठे बदल, मोठा टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि पॅनोरामिक सनरूफ मिळण्याची शक्यता आहे.
स्कोडा आपल्या कुशाक फेसलिफ्टला मार्च 2026 मध्ये बाजारात आणणार असून, त्यानंतर अपडेटेड स्लाव्हिया लाँच होईल. इंजिन पर्याय पूर्वीप्रमाणेच राहतील, मात्र नव्या 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश होणार आहे. यासोबत नवीन रंग, डिजिटल डिस्प्ले आणि पॅनोरामिक सनरूफ देण्यात येईल.
ह्युंदाईकडून एक्सटर आणि वर्ना फेसलिफ्टची जोरदार तयारी सुरू आहे. 2026 वर्नामध्ये नवीन ग्लोबल डिझाइन, सुधारित इंटीरियर आणि अधिक आधुनिक फीचर्स पाहायला मिळतील.
फोक्सवॅगन आपल्या टायगुन आणि व्हर्टस मॉडेल्सना अपडेट करणार असून, स्कोडाच्या कुशाक-स्लाव्हियासारखेच बदल अपेक्षित आहेत.
दरम्यान, मारुती ब्रेझा फेसलिफ्टमध्ये लेव्हल-2 ADAS, अंडरबॉडी CNG टँक आणि किरकोळ डिझाइन बदल मिळण्याची शक्यता आहे. एकूणच, 2026 मध्ये कार खरेदी करणाऱ्यांसाठी हे वर्ष फीचर्स आणि तंत्रज्ञानाने भरलेले ठरणार आहे.













