Government Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी महिना दिलासादायक ठरणार आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना यांचे हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट एकूण ६००० रुपये जमा होणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी मदत ठरणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असून या अंतर्गत २००० रुपये दिले जातील. याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे आठवा आणि नववा असे दोन हप्ते एकाच वेळी देण्यात येणार आहेत.
या योजनेतून प्रत्येकी २००० रुपये प्रमाणे एकूण ४००० रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. परिणामी दोन्ही योजनांचे मिळून ६००० रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत.
दरम्यान, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) पूर्ण करणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही, त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ऑनलाइन किंवा नजीकच्या सेवा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासोबतच फार्मर आयडी असणेही बंधनकारक करण्यात आले आहे. फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यामुळे आयडी काढण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे, खरीप हंगामातील पिक विम्याच्या रकमेची शेतकरी अद्याप वाट पाहत आहेत. रब्बी हंगाम जवळपास संपत आला असतानाही अनेक भागांत खरीप हंगामाचा विमा अजून मिळालेला नाही.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात तब्बल ८७ हजार १३४ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. या शेतकऱ्यांना सुमारे १५२ कोटी रुपयांची विमा रक्कम मिळणे अपेक्षित आहे. प्रशासनाकडून विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात येत असून ती लवकरच पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
एकूणच, पीएम किसान, नमो शेतकरी आणि पीक विमा या तिन्ही माध्यमांतून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्याची शक्यता असून, येणारा काळ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल अशी अपेक्षा आहे.













