मुंबईकरांसाठी धक्कादायक बातमी ! ‘या’ मार्गांवरील लोकल तब्बल तीन महिने बंद ; लाखो प्रवाशांची कोंडी

Published on -

Mumbai Local News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेबाबत एक मोठी आणि प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

गोरेगाव ते सीएसएमटी हार्बर मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना येत्या काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

पश्चिम रेल्वेवर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या (5th & 6th Line) कामाला गती देण्यासाठी गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यानची हार्बर लोकल सेवा सलग तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव ते वांद्रे दरम्यानची हार्बर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. हा ब्लॉक सलग ९० दिवस म्हणजेच सुमारे तीन महिने असणार आहे.

या कालावधीत वांद्रे ते सीएसएमटी दरम्यान काही मोजक्या लोकल सेवा चालवल्या जातील. मात्र, गोरेगाव, जोगेश्वरी आणि अंधेरी परिसरातील प्रवाशांना वांद्रे स्थानक गाठण्यासाठी पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागणार आहे.

हा निर्णय वांद्रे आणि खार स्थानकांदरम्यान असलेला जुना रेल्वे पूल पाडून तिथे नवीन पूल आणि नवीन मार्गिका उभारण्यासाठी घेण्यात आला आहे.

मुंबई सेंट्रल ते बोरीवली दरम्यान दोन नवीन ट्रॅक टाकण्यासाठी हा पूल हटवणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ९६५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सुरुवातीला हे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन होते, मात्र प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी रेल्वेने ते तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले आहे.

या निर्णयाचा थेट परिणाम दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे ३.६२ लाख प्रवाशांवर होणार आहे. गोरेगाव–सीएसएमटी मार्गावरील ८८ फेऱ्या आणि वांद्रे–सीएसएमटी मार्गावरील १०६ फेऱ्या प्रभावित होणार आहेत.

पश्चिम रेल्वेवरून हार्बर मार्गे मध्य रेल्वेकडे जाणाऱ्या प्रवाशांना अंधेरी किंवा दादर मार्गे प्रवास करावा लागणार असल्याने तिथे प्रचंड गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अनेक प्रवाशांना बस, मेट्रो किंवा खासगी वाहनांचा वापर करावा लागेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढणार आहेत.

मात्र, हा तात्पुरता त्रास भविष्यात मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चर्चगेट ते विरार दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढवता येतील.

तसेच लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्याने लोकल गाड्यांना वारंवार थांबावे लागणार नाही. परिणामी, लोकल सेवा अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेवर होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News