Job Alert : नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाली असून, तब्बल २४ वर्षांनंतर महापालिकेतील नोकरभरती प्रक्रियेला वेग आला आहे.
तांत्रिक संवर्गातील अभियंते आणि अग्निशमन विभागातील पदांसाठी एकूण ३०० रिक्त पदांची भरती केली जात असून, यासाठी राज्यभरातून १९ हजार ४०० अर्ज प्राप्त झाले आहेत.

अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या भरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मार्फत येत्या २४ व २५ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती उपआयुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली.
महापालिकेत तांत्रिक संवर्गातील ११४ पदे तर अग्निशमन विभागातील वाहनचालक व फायरमनची १८६ पदे भरली जाणार आहेत.
या पदांसाठी तांत्रिक संवर्गात सर्वाधिक अर्ज प्राप्त झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने राबविण्यासाठी टीसीएसची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश होऊन दहा वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला असला, तरी अद्यापही आस्थापना परिशिष्ट ‘क’ वर्गीय महापालिकेप्रमाणेच आहे.
सध्या महापालिकेत ‘अ’ ते ‘ड’ संवर्गातील एकूण ७,७२५ पदे मंजूर आहेत. लोकसंख्येनुसार मनुष्यबळाची गरज लक्षात घेता, २०१७ मध्ये १४,९४४ पदांचा आकृतिबंध शासनाकडे सादर करण्यात आला होता.
त्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार ९,०१६ पदांचा सुधारित आकृतिबंध महासभेच्या मान्यतेने पाठविण्यात आला; मात्र अद्याप त्यास मान्यता मिळालेली नाही.
सद्यस्थितीत मंजूर पदांपैकी सुमारे ३,८०० पदे रिक्त असून, याचा थेट परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ वाढविणे अत्यावश्यक असल्याने पहिल्या टप्प्यात ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे.
लेखी परीक्षा राज्यातील १० ते ११ शहरांतील केंद्रांवर होणार असून, उमेदवारांना परीक्षेच्या आठ दिवस आधी ऑनलाइन लॉगीन आयडीवर प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.













