रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून थेट दिल्लीसाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस

Published on -

Vande Bharat Express : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेसच्या संदर्भात आणि ही अपडेट समोर येत आहे राज्यसभेतून.

राज्याला लवकरच आणखी एक नवीन वंदे भारत मिळणार असे चित्र तयार होत असून यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू झाला आहे. महाराष्ट्र दिल्ली सोबत थेट वंदे भारत एक्सप्रेसने जोडले जावे यासाठी आता राज्यसभेत मागणी उपस्थित करण्यात आली आहे.

पुणे ते देशाची राजधानी दिल्ली या महत्त्वाच्या लोहमार्गावर अद्याप एकही स्वतंत्र, वातानुकुलित आणि वेगवान ‘प्रीमियम’ श्रेणीतील रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने या मार्गावर आता वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्यसभेत उपस्थित करण्यात आली. पुणे दिल्ली हा एक व्यस्त लोहमार्ग आहे.

यामुळे या मार्गावर वंदे भारतची आवश्यकता असून या मार्गावर प्रीमियम रेल्वे सेवेची गरज अधोरेखित करून देताना खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेच्या शून्यप्रहरात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुणे–दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर, राजधानी एक्सप्रेस किंवा तेजससारखी आधुनिक आणि उच्चगती रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे.

डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, पुणे हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि आयटी केंद्र आहे. ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात नामांकित विद्यापीठे, संशोधन संस्था, ऑटोमोबाईल, संरक्षण आणि स्टार्टअप क्षेत्रातील मोठे उद्योग कार्यरत आहेत.

येथील संरक्षण कॉरिडॉर लवकरच साकारत असून, केंद्र सरकारची अनेक कार्यालये, व्यावसायिक आणि उद्योजक पुण्यात वास्तव्यास आहेत.

व्यवसाय, नोकरी, शिक्षण, प्रशासकीय कामकाजासाठी दररोज हजारो प्रवासी पुणे–दिल्ली दरम्यान प्रवास करतात. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे गाड्या २० ते ३० तासांचा प्रवास करतात.

या गाड्या प्रचंड गर्दीने भरलेल्या असून सुविधा अत्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

थेट प्रीमियम सेवा नसल्यामुळे अनेक प्रवाशांना मुंबईमार्गे प्रवास करावा लागतो किंवा जुन्या आणि संथ गाड्यांवर अवलंबून राहावे लागते.

यामुळे वेळेचा तसेच पैशांचाही अपव्यय होत आहे. पुणे हे वेगाने विकसित होणारे महानगर असून दिल्लीशी थेट, जलद आणि आरामदायी रेल्वे सेवा ही काळाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे–दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपरसारखी आधुनिक ट्रेन सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा प्रवाशांना मिळतील. दिल्लीहून पुण्यात येणाऱ्या अधिकारी, व्यावसायिक आणि पर्यटकांनाही याचा मोठा फायदा होईल.

त्यामुळे पुणे शहराला ‘प्रीमियम’ रेल्वे सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम भूमिका डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत मांडली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News