Nashik Ring Road : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा मानला जाणारा परिक्रमा मार्ग अर्थात बाह्य रिंग रोड प्रकल्प गतीने पुढे सरकू लागला आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला चालना दिली असून, एकूण ६६.५ किलोमीटर लांबीच्या रिंग रोडसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या रिंग रोडपैकी सुमारे १६ किलोमीटरचा भाग नाशिक महापालिकेच्या हद्दीतून जात असल्यामुळे, या भागातील भूसंपादनासाठी एमएसआयडीसीने महापालिकेकडे मदतीची मागणी केली आहे.
सध्या महापालिकेने सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्याची जागा आधीच संपादित केलेली असून, त्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा प्रस्ताव लवकरच एमएसआयडीसीकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे.
उर्वरित १३ किलोमीटर अंतरावरील जागेचे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेने स्थानिक शेतकरी आणि जमीनधारकांची माहिती एमएसआयडीसीला देण्याची तयारी दर्शवली आहे.
या प्रक्रियेमुळे भूसंपादन अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, महापालिका हद्दीतील तीन किलोमीटर अंतरावरील भूसंपादनाचा मोबदला महापालिकेकडूनच स्वीकारण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह केंद्र सरकारकडूनही या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर एमएसआयडीसीने रिंग रोडच्या विकासासाठी पहिली निविदा प्रसिद्ध केली आहे.
रिंग रोडचे काम एकूण सात टप्प्यांमध्ये विभागण्यात आले असून, तब्बल ३३०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होतात. या पार्श्वभूमीवर शहरातील अंतर्गत वाहतूक कमी करून बाह्य मार्गांद्वारे वाहनांची सोय करण्यासाठी हा रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
कुंभमेळ्यानंतरही शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि औद्योगिक व शहरी विस्ताराला चालना देण्यासाठी हा प्रकल्प मोलाचा ठरेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.












