UPI PF Withdrawal : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी मोठी डिजिटल सुविधा आणण्याच्या तयारीत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, यावर्षी एप्रिल महिन्यापासून ईपीएफओचे नवे मोबाइल ॲप लाँच होण्याची शक्यता असून, या ॲपद्वारे सदस्यांना यूपीआय पेमेंट गेटवे वापरून पीएफची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करता येणार आहे.

यामुळे पीएफ विड्रॉ करण्याची प्रक्रिया अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
कामगार मंत्रालय सध्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. या योजनेअंतर्गत ईपीएफ खात्यातील काही रक्कम सुरक्षित (गोठवलेली) ठेवण्यात येईल, तर उर्वरित मोठा भाग सदस्यांना यूपीआयच्या माध्यमातून त्वरित विड्रॉ करता येईल.
यामुळे आपत्कालीन गरजांच्या वेळी सदस्यांना पीएफच्या पैशांसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
ईपीएफओचे हे नवे ॲप कोट्यवधी सदस्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात येत आहे. सध्या सदस्यांना पीएफ खात्यासंबंधी सेवा मिळवण्यासाठी यूएएन पोर्टल किंवा उमंग ॲपचा वापर करावा लागतो.
नवे ॲप सुरू झाल्यानंतरही या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेवा सुरू राहतील, मात्र स्वतंत्र ईपीएफओ ॲपमुळे सेवा अधिक वेगवान आणि वापरण्यास सोप्या होतील.
या नव्या ॲपद्वारे सदस्य त्यांच्या पीएफ खात्यातील पात्र शिल्लक रक्कम सहज पाहू शकतील. तसेच, किती रक्कम विड्रॉ करता येईल, हेही स्पष्टपणे ॲपमध्ये दिसणार आहे.
सदस्य थेट त्यांच्या आधीपासून लिंक केलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतील. सुरक्षित व्यवहारासाठी यूपीआय पिनचा वापर अनिवार्य असणार आहे.
याशिवाय, या ॲपमधून पीएफ पासबुक बॅलन्स तपासण्याची सुविधाही उपलब्ध असेल. ईपीएफओ सध्या या नव्या सेवेची चाचणी करत असून, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर हे ॲप लाँच करण्याची तयारी सुरू आहे.
या डिजिटल बदलामुळे ईपीएफओच्या सेवा अधिक पारदर्शक, जलद आणि सदस्य-केंद्रित होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.












