Mumbai Nagpur Express Train : मुंबई ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई नागपूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसच्या वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून मोठा बदल होणार आहे.
यामुळे जर तुम्हीही दुरांतो एक्सप्रेसने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची असेल. कारण की, आज आपण दुरांतो एक्सप्रेसच्या वेळापत्रकात नेमका काय बदल झालाय हा बदल का करण्यात आलाय आणि या गाडीचे नवीन वेळापत्रक कसे आहे याविषयीची सविस्तर माहिती येथे जाणून घेणार आहोत.

मध्य रेल्वेचा नवा निर्णय
मुंबई आणि नागपूरदरम्यान धावणाऱ्या महत्त्वाच्या मुंबई-नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२२८९/१२२९०) च्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, ऑपरेशनल कारणांमुळे दुरांतो एक्सप्रेस च्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल झालेला आहे.
हे बदल १४ एप्रिलपासून लागू होणार असून, यामुळे दुरांतो एक्स्प्रेसच्या एकूण प्रवासाच्या कालावधीत १५ मिनिटांची वाढ होणार आहे. सध्या सुमारे ८०० किलोमीटरचे अंतर दुरांतो एक्स्प्रेस ११ तास ३५ मिनिटांत पूर्ण करते.
मात्र, सुधारित वेळापत्रकानुसार हा प्रवास आता ११ तास ५० मिनिटांचा होणार आहे. वेळेत झालेल्या या बदलांचा परिणाम दोन्ही दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे.
मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या प्रवासात बदल
आतापर्यंत मुंबई सीएसएमटी येथून दुरांतो एक्स्प्रेस रात्री ७:५५ वाजता रवाना होत होती. नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी आता रात्री ८:३५ वाजता सुटणार आहे. तसेच नागपूर येथे पोहोचण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सध्या सकाळी ८:०५ वाजता नागपूरला पोहोचणारी गाडी, १४ एप्रिलपासून सकाळी ७:५० वाजता पोहोचेल.
नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवासातही बदल
नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या सुटण्याच्या वेळेतही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सध्या ही गाडी रात्री ८:३० वाजता नागपूरहून सुटते. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी ३५ मिनिटे आधी, म्हणजेच रात्री ७:५५ वाजता मुंबईकडे रवाना होईल.
परिणामी, मुंबई सीएसएमटी येथे गाडी पोहोचण्याची नवीन वेळ सकाळी ८:२० वाजता असेल. यापूर्वी ही गाडी सकाळी ७:२० वाजता मुंबईत दाखल होत होती.
प्रवाशांमध्ये नाराजीची शक्यता
विशेषतः नागपूरहून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गाडी सुटण्याची वेळ आधी झाल्याने काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यालयीन वेळा, स्थानिक वाहतूक आणि जोड प्रवास यावर या बदलांचा परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, मध्य रेल्वेने प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रकाची माहिती तपासावी, असे आवाहन केले आहे. वेळापत्रकातील या बदलांमुळे प्रवास अधिक सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.












