पुणे म्हाडा ४,१८६ घरांची सोडत अखेर जाहीर; दोन लाखांहून अधिक अर्जदारांचे नशीब आज ठरणार

Published on -

Mhada Lottery News : म्हाडाच्या पुणे मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या ४,१८६ घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

विविध तांत्रिक अडचणी, अर्ज छाननीतील विलंब आणि जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेमुळे वारंवार पुढे ढकलण्यात आलेली ही बहुप्रतिक्षित सोडत आज मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जाहीर करण्यात आली.

या सोडतीसाठी तब्बल २ लाख १५ हजारांहून अधिक अर्जदारांनी सहभाग नोंदवला असून, काही तासांतच ४,१८६ नशीबवान विजेत्यांची नावे समोर येणार आहेत.

पुणे मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२ वाजता पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात सोडतीचा कार्यक्रम पार पडला.

पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. तर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

या सोडतीअंतर्गत २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत ३,३२२ घरे आणि १५ टक्के एकात्मिक योजनेंतर्गत ८६४ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

एकूण ४,१८६ घरांसाठी सुमारे २ लाख १५ हजार अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या सोडतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

या घरांची जाहिरात सप्टेंबर २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक बिघाड, अर्जांची छाननी प्रक्रिया वेळेत पूर्ण न होणे आणि त्यानंतर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे सोडत अनेकदा पुढे ढकलण्यात आली.

यामुळे नाराज झालेल्या अर्जदारांनी आंदोलन आणि मोर्चेही काढले होते. अखेर आचारसंहिता संपल्यानंतर १० फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली.

पुणे म्हाडा निकाल कसा पाहायचा?

सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. तसेच सोडतीनंतर काही तासांतच https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विजेत्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल.

लॉटरी लागलेल्या अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे निकालाची माहिती दिली जाणार आहे. इच्छुक अर्जदार कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहूनही निकाल पाहू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News