Railway News : फेब्रुवारी महिन्यात नागपूरकडे होणारी प्रवासी गर्दी लक्षणीय वाढत असल्याने मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
सणासुदीचे दिवस, विविध कार्यक्रम आणि अचानक वाढणाऱ्या प्रवासी मागणीचा विचार करता ‘टाईम टेबल ऑन डिमांड’ (टीओडी) योजनेअंतर्गत एकूण १२ विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-नागपूर, पुणे-नागपूर तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-नागपूर या महत्त्वाच्या मार्गांवर धावणार आहेत.
एलटीटी-नागपूर-एलटीटी मार्गावर विशेष गाडी क्रमांक ०१०२१/०१०२२ एकूण चार फेऱ्यांसाठी चालवण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०१०२१ ही १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून पहाटे १२.५५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूरला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०२२ ही नागपूरहून १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता एलटीटीला पोहोचेल.
या विशेष गाडीत आधुनिक एलएचबी डब्यांची रचना करण्यात आली असून प्रवाशांच्या सुरक्षितता आणि आरामावर विशेष भर देण्यात आला आहे.
या गाडीत १ एसी द्वितीय श्रेणी, ६ एसी तृतीय श्रेणी, ९ स्लीपर, ४ सर्वसाधारण द्वितीय श्रेणी डबे, एक सर्वसाधारण द्वितीय श्रेणी-कम-गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅनचा समावेश असेल.
याशिवाय पुणे-नागपूर-पुणे या मार्गावरही विशेष गाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०१४६७/०१४६८ या चार फेऱ्यांमध्ये चालवण्यात येतील.
गाडी क्रमांक ०१४६७ पुण्याहून १३ आणि २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४६८ नागपूरहून १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सुटून रात्री ११.३० वाजता पुण्याला पोहोचेल.
या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण १० फेब्रुवारीपासून सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे.
प्रवाशांनी या अतिरिक्त रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.













