‘इथे’ सुरु झाला होता जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल; कसा राहिलाय ट्रॅफिक सिग्नलचा आत्तापर्यंतचा प्रवास ?

Published on -

First Traffic Signal : आज ट्रॅफिक सिग्नलशिवाय शहरातील वाहतूक सुरळीत चालू शकते, अशी कल्पनाही करवत नाही.

रोज लाखो वाहनांना शिस्त लावण्याचं काम हे लाल, पिवळे आणि हिरवे दिवे अगदी शांतपणे करत असतात. मात्र, या ट्रॅफिक सिग्नलचा प्रवास कसा सुरू झाला, याचा इतिहास फारच रंजक आहे.

जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल ८ डिसेंबर १८६८ रोजी लंडनमधील ब्रिटिश संसदेच्या बाहेर, वेस्टमिंस्टर येथे बसवण्यात आला. वाढत्या घोडागाडींच्या गर्दीमुळे होणाऱ्या ट्रॅफिक जॅमवर उपाय म्हणून हा प्रयोग करण्यात आला होता.

हा सिग्नल रेल्वे इंजिनिअर जॉन पीक नाईट यांनी डिझाइन केला होता. त्यांनी रेल्वे सिग्नलिंग सिस्टीमची संकल्पना रस्त्यावरील वाहतुकीसाठी वापरली.

आजच्या आधुनिक इलेक्ट्रिक सिग्नलच्या तुलनेत हा पहिला सिग्नल खूप वेगळा होता. तो गॅसवर चालणारा होता.

रात्री लाल आणि हिरव्या रंगाचे गॅस लॅम्प पेटवून वाहनांना संकेत दिले जात. त्यामध्ये ना बल्ब होते, ना वायरिंग आणि ना ऑटोमॅटिक टायमर. त्यामुळे ही प्रणाली अत्यंत धोकादायक ठरली.

हा सिग्नल पूर्णपणे मॅन्युअली ऑपरेट केला जात असे. एक पोलीस अधिकारी सिग्नलजवळ उभा राहून लीवरच्या सहाय्याने तो नियंत्रित करत होता.

दिवसा सिग्नल देण्यासाठी सेमाफोर आर्म्सचा वापर केला जात असे. आर्म्स आडवे असतील तर ‘थांबा’ आणि ४५ अंशात खाली असतील तर ‘सावधान’ असा अर्थ घेतला जात होता.

त्या काळातील सिग्नलमध्ये आजसारखा पिवळा दिवा नव्हता. फक्त लाल आणि हिरवा हे दोनच रंग वापरले जात होते. मात्र हा प्रयोग फार काळ टिकला नाही.

२ जानेवारी १८६९ रोजी गॅस लीकमुळे सिग्नलमध्ये स्फोट झाला आणि सिग्नल ऑपरेट करणारा पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला. त्यानंतर ही प्रणाली बंद करण्यात आली.

यानंतर जवळपास ४५ वर्षांनी, १९१४ मध्ये अमेरिकेतील क्लीवलँड शहरात जगातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आला.

याच सिस्टीममुळे आज जगभरात वापरल्या जाणाऱ्या ऑटोमेटेड, रंग-कोडेड ट्रॅफिक सिग्नलची पायाभरणी झाली. साध्या गॅस लॅम्पपासून ते आजच्या स्मार्ट AI-आधारित सिग्नलपर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News