गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात पीएम ई-बस सेवेचा शुभारंभ; ५० बसेसचे पीएम मोदींच्या हस्ते लोकार्पण

Published on -

Nagpur E-Bus Service : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात आणि सबंध देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सरकार सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देताना दिसत आहे.

याचाच एक भाग म्हणून विदर्भ प्रांतातील नागपूर शहरात ५० नव्या इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे.

खरेतर पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत नागपूर शहरासाठी जवळपास दीडशे बसेस मंजूर झालेल्या आहेत. याच मंजूर करण्यात आलेल्या १५० इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील ५० बसेसचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.

१४ फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बसेसचे लोकार्पण करतील. महत्त्वाची बाब म्हणजे लोकार्पण केल्या जाणाऱ्या बसेसपैकी ३० बसेस शहरात दाखल झाल्या असून आणखी २० बसेस लवकरच शहरात दाखल होणार अशी माहिती समोर आली आहे.

या उपक्रमामुळे नागपूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडणार असल्याचे मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि चहूबाजूंनी होत असलेला विस्तार लक्षात घेता सक्षम व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे अत्यावश्यक बनले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पीएम ई-बस सेवा योजनेत देशातील चार शहरांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये नागपूरचा समावेश हा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद मानला जात आहे. नागपूरसह भावनगर (गुजरात), चंदीगड आणि गुवाहाटी येथे ही सेवा एकाच वेळी सुरू होणार आहे.

पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख वर्दळीच्या मार्गांवर ५० उच्चतंत्रज्ञानयुक्त हायड्रोलिक इलेक्ट्रिक बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. या बसेसमध्ये दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा, सुलभ चढ-उतार व्यवस्था, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक सुरक्षा प्रणालीचा समावेश आहे.

या बसेस केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. इलेक्ट्रिक बसचा पहिला ताफा १७ नोव्हेंबर २०२५ रोजी नागपुरात दाखल झाला होता.

लोकार्पणाचा कार्यक्रम शनिवारी सकाळी १० वाजता ‘आपली बस’च्या कोराडी डेपो येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, महापौर नीता ठाकरे तसेच मनपाचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या ई-बस सेवेच्या प्रारंभामुळे प्रदूषणात घट, इंधन बचत आणि प्रवाशांना सुरक्षित व स्वस्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून नागपूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe