Share Market News : बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सलग चौथ्या दिवशी हिरव्या निशाणीसह सुरुवात झाली. सकाळच्या व्यवहारात NIFTY 50 ने क्षणभर 26,000 चा टप्पा ओलांडला, तर BSE सेन्सेक्स सुमारे 80 अंकांनी वधारून 84,300 च्या आसपास व्यवहार करत होता.
सकाळी साडेनऊच्या सुमारास निफ्टी 26,000 च्या जवळपास स्थिरावला होता. मात्र, बँक निफ्टीमध्ये आजही दबाव कायम दिसून आला आणि त्यात घसरण नोंदवली गेली.

क्षेत्रनिहाय पाहता, ऑटो आणि ग्राहकउपयोगी वस्तू (FMCG/कन्झम्पशन) क्षेत्रात चांगली खरेदी झाली. वाहन कंपन्यांच्या शेअर्समध्ये सकारात्मक वातावरण दिसून आले. दुसरीकडे, मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात हलकी घसरण झाली असून काही शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली.
जागतिक बाजारांकडून संमिश्र संकेत मिळाले. मंगळवारी अमेरिकन बाजारात टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये नफावसुली झाली. नॅस्डॅक जवळपास 150 अंकांनी घसरला,
तर डाओ जोन्स निर्देशांकाने नवा लाइफ हाय गाठत सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम ठेवली. या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारांत मिश्र वातावरण होते. मात्र GIFT निफ्टी मजबूत राहिल्यामुळे भारतीय बाजाराला सुरुवातीला आधार मिळाला.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) सलग तिसऱ्या दिवशी खरेदी करत बाजाराला पाठबळ दिले. कॅश आणि फ्युचर्स मिळून सुमारे 800 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी झाली. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) देखील दुसऱ्या दिवशी गुंतवणूक वाढवली. त्यामुळे एकूण गुंतवणूक प्रवाह सकारात्मक राहिला.
कमोडिटी बाजारात सोनं सुमारे 30 डॉलरने घसरलं, तर चांदीत जवळपास 2 टक्क्यांची घसरण झाली. देशांतर्गत बाजारातही सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्या. कच्चं तेल मात्र 69 डॉलरच्या आसपास स्थिर राहिलं असून गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेच्या क्रूड इन्व्हेंटरी डेटाकडे लागले आहे.
कॉर्पोरेट घडामोडींमध्ये BHEL चा ऑफर फॉर सेल (OFS) आज नॉन-रिटेल गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. सरकार कंपनीतील 5 टक्के हिस्सा विकणार असल्याने शेअरमध्ये चढ-उतार अपेक्षित आहेत. दरम्यान, Tata Motors ला सुमारे 70 हजार कमर्शियल वाहनांची मोठी ऑर्डर मिळाल्याने कंपनीच्या शेअरमध्ये सकारात्मक हालचाल दिसू शकते.
डिसेंबर तिमाहीत Titan Company चे निकाल मजबूत राहिले. आज M&M, Ashok Leyland, Divi’s Lab, Max Financial आणि Patanjali यांच्या निकालांवर बाजाराचे विशेष लक्ष राहणार आहे.













