वंदे मातरमबाबत शासनाचा मोठा निर्णय ! गृह मंत्रालयाचा नवा प्रोटोकॉल जारी, आता…..

Published on -

Vande Mataram : केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘वंदे मातरम’ संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेत नवीन प्रोटोकॉल जारी केला आहे. या नव्या नियमांनुसार, केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ गाणे किंवा वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे.

२८ जानेवारी रोजी जारी करण्यात आलेला हा सुमारे १० पानांचा सविस्तर आदेश सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, विविध मंत्रालये आणि संवैधानिक संस्थांना पाठवण्यात आला आहे.

मंत्रालयाच्या आदेशानुसार, जर एखाद्या अधिकृत कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ आणि राष्ट्रगीत ‘जन गण मन’ दोन्ही सादर केले जाणार असतील, तर सर्वप्रथम ‘वंदे मातरम’ वाजवले जाईल आणि त्यानंतर ‘जन गण मन’ सादर केले जाईल. या दोन्ही सादरीकरणांच्या वेळी उपस्थित सर्व व्यक्तींनी आदरपूर्वक उभे राहणे बंधनकारक असेल.

नव्या नियमांनुसार, सहा श्लोक असलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताची संपूर्ण अधिकृत आवृत्ती, ज्याचा कालावधी ३ मिनिटे १० सेकंद आहे, तीच अधिकृत प्रसंगी वापरणे आवश्यक राहील. कोणतीही संक्षिप्त किंवा अपूर्ण आवृत्ती अधिकृत कार्यक्रमांमध्ये स्वीकारली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हा प्रोटोकॉल विशेषतः तिरंगा ध्वज फडकवण्याच्या वेळी, राष्ट्रपतींच्या आगमन व प्रस्थान प्रसंगी, राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी आणि नंतर, तसेच राज्यपाल किंवा उपराज्यपालांच्या आगमन-प्रस्थान आणि भाषणांपूर्वी व नंतर लागू राहील. या सर्व प्रसंगी ‘वंदे मातरम’ वाजवले किंवा गायले जाणे अनिवार्य असेल.

मात्र, मंत्रालयाने एक महत्त्वाची सूटही दिली आहे. जर ‘वंदे मातरम’ एखाद्या वृत्तचित्र, माहितीपट किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग म्हणून सादर केले गेले, तर प्रेक्षकांनी उभे राहणे बंधनकारक राहणार नाही. कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये यासाठी ही तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील अधिकृत कार्यक्रमांच्या प्रोटोकॉलमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार असून, संबंधित सर्व यंत्रणांना त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe