Kisan Credit Card : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेत महत्त्वाचे बदल करण्याची तयारी सुरू केली असून, यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कृषी कर्ज वितरण अधिक सुसंगत, पारदर्शक आणि गरजेनुसार करण्याच्या उद्देशाने आरबीआय बँकांना अद्ययावत आणि एकात्मिक मार्गदर्शक सूचना देणार आहे. या बदलांमुळे शेतीशी संबंधित कर्जाचे स्वरूप, मंजुरी प्रक्रिया आणि निधीचा वापर यामध्ये स्पष्टता येणार आहे.

सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे KCC कर्जाचा कालावधी वाढवण्याचा. सध्या हंगामी पद्धतीने परतफेडीची रचना असताना, हा कालावधी सहा वर्षांपर्यंत वाढवण्याचा विचार सुरू आहे.
जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर शेतकऱ्यांना दीर्घ कालावधीसाठी कर्जाचा वापर करता येईल आणि परतफेडीसाठी अधिक वेळ मिळेल. त्यामुळे हंगामानुसार उत्पन्न मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक नियोजन करणे सुलभ होईल.
याशिवाय, कर्ज मर्यादा ठरवताना ‘स्केल ऑफ फायनान्स’शी थेट जोडणी करण्याचा आरबीआयचा प्रयत्न आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या पिकांच्या खर्चानुसार आणि शेतीच्या प्रत्यक्ष गरजेनुसार कर्ज मर्यादा निश्चित केली जाईल.
त्यामुळे एकसारखी ठराविक रक्कम देण्याऐवजी वास्तव खर्च लक्षात घेऊन अधिक किंवा योग्य कर्ज उपलब्ध होईल. यामुळे लहान व मध्यम शेतकऱ्यांनाही त्यांच्या गरजेनुसार आर्थिक मदत मिळू शकते.
तसेच, आधुनिक कृषी उपकरणे, स्मार्ट शेतीसाठी लागणारी साधने, कृषी अवजारे आणि संबंधित औद्योगिक उपकरणे KCC अंतर्गत खरेदी करता येण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे शेतीचे आधुनिकीकरण वेगाने होण्यास मदत होईल. नियम अधिक स्पष्ट आणि पारदर्शक झाल्यास कर्ज मंजुरी प्रक्रिया जलद होण्याची अपेक्षा आहे.
हे सर्व बदल कधीपासून लागू होतील, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी लवकरच यासंदर्भात सविस्तर माहिती जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी आणि बँकिंग क्षेत्र या निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.













