PM Awas Yojana : पिंपरी-चिंचवड शहरात पंतप्रधान आवास योजनेच्या (PMAY) दुसऱ्या टप्प्याला गती मिळाली असून शहरातील नऊ ठिकाणी सुमारे साडेसहा हजार सदनिका उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी, ताथवडे, रावेत (एक व दोन) आणि चोविसावाडी येथे हे गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या टप्प्याची सुरुवात रावेत येथील गृहप्रकल्पापासून होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

यापूर्वी न्यायालयीन वाद आणि जागा ताब्यात न मिळाल्याने रावेत येथील ९३४ सदनिकांचा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. त्या लाभार्थ्यांना किवळे येथील खासगी प्रकल्पात घरे देण्यात आली होती.
आता सुधारित विकास आराखड्यात (डीपी प्लान) आवश्यक जागा आरक्षित करून रावेत प्रकल्पाचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. रावेत येथे जुना व नवा असे दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत. सध्या रावेतमधील दोन जागा ताब्यात असून उर्वरित सात जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी आणि रावेत येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) घरे बांधली जाणार आहेत. तर ताथवडे, रावेत व चोविसावाडी येथे एचडीएच गटासाठी (बेघरांसाठी) प्रकल्प उभारले जातील.
केंद्र व राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येत असून मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात केली जाणार आहे. प्रत्यक्ष घर मिळण्यासाठी नागरिकांना दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात मोशी, चऱ्होली, पिंपरी आणि आकुर्डी येथे एकूण ३ हजार ६६८ सदनिकांचे वितरण करण्यात आले होते. डुडुळगाव येथील १ हजार १९० सदनिकांचीदेखील सोडत काढण्यात आली आहे.
योजनेत उत्पन्नाची मर्यादा तीन लाखांवरून सहा लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच कार्पेट क्षेत्रफळ ३० चौरस मीटरवरून ४५ चौरस मीटर (४८४ चौ.फुट) करण्यात आले आहे.
झोपडपट्टीतील पात्र कुटुंबांचाही समावेश केल्याने अधिक नागरिकांना लाभ मिळणार आहे. लाभार्थी सर्वेक्षणासाठी स्वतंत्र एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेने दिली.













