सरकारी नोकरीसाठी इच्छुक तरुणांनो तयारीला लागा ! राज्यात ७० हजार पदांची मेगाभरती; ५,५०० प्राध्यापक पदांना मंजुरी

Published on -

Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच ही बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. मंडळी, राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील तरुणांसाठी हजारो पदांची नोकरभरतीची मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विविध विभागातील जवळपास 70000 रिक्त पदांची नोकर भरती येत्या काळात राबवली जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रशासनातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रिक्त पदांची कोंडी फोडण्यासाठी हा मोठा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनातील विविध विभागांमधील तब्बल ७० हजार जागांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विविध विभागांमधील मनुष्यबळाची कमतरता भरून निघण्यास मदत होणार असून प्रशासनाचा वेग आणि कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या मेगाभरतीत उच्च शिक्षण क्षेत्रालाही मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत होता. सध्या सुमारे ११ हजार प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे सांगितले जाते. यापैकी पहिल्या टप्प्यात ५,५०० प्राध्यापक पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

तसेच विद्यापीठांच्या मुख्य कॅम्पसमधील सुमारे ७०० प्राध्यापक पदांची भरतीही लवकरच करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे SET, NET आणि Ph.D. धारक उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण (NEP) प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक मनुष्यबळही यामुळे उपलब्ध होईल.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय यंत्रणा सक्षम करण्यासाठी ७० हजार पदे भरण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये २० हजार पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरली जाणार असून राजपत्रित आणि अराजपत्रित दोन्ही श्रेणीतील पदांचा समावेश असेल. गृह विभागातील पोलीस भरती, महसूल विभागातील तलाठी आणि लिपिक पदे, आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषदांतील विविध रिक्त जागांचा यात समावेश होण्याची शक्यता आहे.

आचारसंहितेमुळे काही भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्थगित झाल्या होत्या. मात्र आचारसंहिता संपताच या भरती प्रक्रिया युद्धपातळीवर राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या काही आठवड्यांत विविध विभागांच्या अधिकृत जाहिराती प्रसिद्ध होण्याची शक्यता असून राज्यातील तरुणांसाठी ही एक मोठी रोजगारसंधी ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe