म्हाडा सोडत पूर्ण; ४,१८६ सदनिकांसाठी २.५८ लाख अर्ज, अनेकांचे घराचे स्वप्न साकार

Published on -

Mhada News : राज्यातील नगर परिषद, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमुळे काही काळ रखडलेली म्हाडाच्या सदनिकांची बहुप्रतीक्षित सोडत अखेर बुधवारी पार पडली.

पुणे जिल्हा परिषद येथील शरदचंद्र पवार सभागृहात पार पडलेल्या या ऑनलाइन सोडतीत अनेक अर्जदारांचे स्वप्न साकार झाले, तर काहींना यावेळीही निराशेने परतावे लागले. सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते, त्यामुळे राज्यभरातील अर्जदारांनी घरबसल्या निकाल पाहिला.

म्हाडातर्फे पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीसह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील घरांसाठी ११ सप्टेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत एकूण ४,१८६ सदनिकांचा समावेश होता.

त्यापैकी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र तसेच पीएमआरडीएअंतर्गत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील ३,३२२ सदनिका आणि १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिका सोडतीसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

अर्जदारांच्या मागणीनुसार तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. एकूण २,५८,८३२ अर्ज प्राप्त झाले,

त्यापैकी २,१५,९६५ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीत सहभाग नोंदवला. या प्रचंड प्रतिसादामुळे घरांची मागणी किती मोठी आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले.

सोडतीदरम्यान क्रमांक लागलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला. काहींनी कुटुंबासह उपस्थित राहून जल्लोष साजरा केला, तर अनेकांनी ऑनलाइन निकाल पाहताच समाधान व्यक्त केले.

मात्र, घराचा क्रमांक न लागलेल्या अर्जदारांमध्ये नाराजीही दिसून आली. म्हाडातर्फे यशस्वी अर्जदारांचे अभिनंदन करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमात म्हाडाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील आणि उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

पारदर्शक आणि संगणकीकृत पद्धतीने सोडत प्रक्रिया पार पडल्याचा दावा म्हाडाने केला असून, पुढील टप्प्यात निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्र पडताळणी आणि ताबा प्रक्रियेबाबत सूचना दिल्या जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe