Gold Jewelry Rules : भारतीय संस्कृतीत सोन्याला विशेष स्थान आहे. सण-समारंभ, लग्नकार्य किंवा सुरक्षित गुंतवणूक म्हणून भारतीय कुटुंबे सोन्याला प्राधान्य देतात.
गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने अनेकांनी घरातील दागिने आणि नाणी विकून नफा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात सराफांकडून बाजारभावापेक्षा ५ ते २० टक्क्यांपर्यंत कमी रक्कम मिळत असल्याने विक्रेत्यांचा हिरमोड होत आहे.

कानपूरचे उमेश शुक्ला यांनी पाच वर्षांपूर्वी घेतलेली अंगठी आणि चेन विकण्यासाठी दुकान गाठले. सध्याचा दर जास्त असल्याने चांगला फायदा होईल, अशी अपेक्षा होती;
पण दुकानदारांनी बाजारभावापेक्षा १० ते १५ टक्के कमी दर सांगितला. दिल्ली-एनसीआरमधील अनुरागलादेखील नाणे विकताना जवळपास ५ टक्के कमी किंमत मिळण्याची ऑफर देण्यात आली. बहुतेक ठिकाणी विक्रेत्यांना अशाच अनुभवाला सामोरे जावे लागत आहे.
तज्ज्ञांच्या मते, या तफावतीमागे मेकिंग चार्जेस, जीएसटी, शुद्धतेची तपासणी, ‘मेल्टिंग’ आणि ‘वेस्टेज’ कपात तसेच सराफाचा मार्जिन हे घटक कारणीभूत असतात.
उदाहरणार्थ, पाच वर्षांपूर्वी १० ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे ४८ हजार रुपये होती. त्यावर १२ ते २० टक्के मेकिंग चार्जेस आणि जीएसटी मिळून एकूण किंमत ५८ हजार रुपयांपेक्षा जास्त झाली होती.
मात्र विक्रीवेळी सराफ ५ ते ८ टक्के मेल्टिंग कपात आणि त्यावर अतिरिक्त ४ ते ५ टक्के मार्जिन लावतात. त्यामुळे सध्याचा दर १.५५ लाख रुपये असला तरी प्रत्यक्षात १८ ते २० हजार रुपयांपर्यंत कमी रक्कम मिळू शकते. शुद्धता कमी आढळल्यास कपात आणखी वाढते.
ब्रँडेड शोरूम्समध्ये ‘बायबॅक’ योजना तुलनेने फायदेशीर असतात. स्वतःकडून खरेदी केलेल्या दागिन्यांवर ० ते २ टक्क्यांपर्यंतच कपात केली जाते. गुंतवणुकीसाठी दागिन्यांऐवजी सोन्याची नाणी किंवा ‘गोल्ड ईटीएफ’ हा अधिक पारदर्शक पर्याय असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. ईटीएफमध्ये मेकिंग चार्जेस किंवा शुद्धतेची चिंता नसते.
सोने विकताना हॉलमार्क, बिल जपून ठेवणे आणि एकापेक्षा अधिक ठिकाणी दर तपासणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्यात गुंतवणूक करताना व्यापाऱ्याप्रमाणे नव्हे तर दीर्घकालीन गुंतवणूकदाराप्रमाणे विचार करणे अधिक फायदेशीर ठरते.













