Signal-Free Corridor : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उत्तर मुंबईतील प्रवाशांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
मात्र, सध्या या प्रवाशांना ठाणे-बेलापूर मार्ग किंवा पाम बीच रोडसारख्या गर्दीच्या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत असल्याने वाहतूक कोंडी आणि वेळेचा मोठा अपव्यय होत आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सिडकोने ठाणे ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान २६ किलोमीटर लांबीचा उन्नत (Elevated) आणि पूर्णतः सिग्नलमुक्त कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया वेगात पार पाडण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सल्लागार नियुक्त झाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला जाईल. त्यामध्ये तांत्रिक रचना, भूसंपादन, पर्यावरणीय परिणाम आणि प्रकल्पाचा अंतिम खर्च यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
सध्या ठाणे ते नवी मुंबई विमानतळ या प्रवासासाठी सुमारे ८० ते ९० मिनिटे लागतात. प्रस्तावित उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या ३० ते ४५ मिनिटांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्याबरोबरच इंधन बचत आणि वाहतूक कोंडीमध्येही मोठी घट होण्याची अपेक्षा आहे.
या २६ किलोमीटरच्या मार्गाचा मोठा भाग उन्नत स्वरूपात बांधण्यात येणार आहे. हा मार्ग दिघ्यातील पटणी चौकापासून सुरू होणार असून पहिला टप्पा पटणी चौक ते वाशीपर्यंत सुमारे १७ किलोमीटरचा असेल.
हा टप्पा ठाणे-बेलापूर मार्गाला समांतर असेल. वाशीपासून पुढे नवी मुंबई विमानतळापर्यंतचा उर्वरित मार्ग उन्नत आणि दुमजली (डबल डेकर) स्वरूपात उभारण्याचे नियोजन आहे.
सिडकोच्या प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी सुमारे ८,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आर्थिक व्यवहार्यता तपासल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाईल.
ठाणे आणि नवी मुंबईदरम्यानची वाढती वाहतूक लक्षात घेता हा उन्नत कॉरिडॉर भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे मानले जात आहे.













