एसटी प्रवासात डिजिटल क्रांती ! ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ होणार अनिवार्य, प्रवाशांवर काय परिणाम होणार?

Published on -

ST Mahamandal : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासात आता तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढणार असून, रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली. हा निर्णय केवळ तांत्रिक सुधारणा नसून, प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या नव्या प्रणालीमुळे सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या सर्व सुविधा एका स्मार्ट कार्डमध्ये उपलब्ध होणार आहेत.

विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता हे कार्ड अनिवार्य असणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसून प्रवास व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहे.

या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे.

लवकरच राज्यातील सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.

दिव्यांग प्रवाशांना त्यांच्या UDID क्रमांकाशी जोडलेले विशेष कार्ड दिले जाणार आहे. तसेच स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयामार्फत कार्ड वितरित करण्यात येणार आहे.

नवीन कार्डाची किंमत १९९ रुपये (GST सह) असून, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत ते उपलब्ध होईल. कार्डमध्ये किमान १०० रुपये रिचार्ज करणे आवश्यक असून ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येईल.

ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटमार्फत रिचार्जची सुविधा उपलब्ध असेल. ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सोयीसाठी ३००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत.

एसटीचा हा निर्णय परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. एका स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार असल्याचा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News