Stock Market News : सलग चार दिवसांच्या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला असून जागतिक बाजारातून आलेल्या कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली.
अमेरिकन बाजारातील पडसाद आणि आयटी शेअर्समधील जोरदार विक्रीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक लाल निशाणावर उघडले.

सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स सुमारे 370 अंकांनी घसरून 83,850 च्या आसपास पोहोचला, तर निफ्टी जवळपास 120 अंकांनी घसरत 25,840 च्या खाली व्यवहार करत होता.
बँक निफ्टीतही सौम्य घसरण दिसून आली. प्रायव्हेट बँकांचे काही शेअर्स टिकून असले तरी बहुतांश क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव होता.
विशेषतः आयटी क्षेत्रात मोठी घसरण नोंदवली गेली. आयटी निर्देशांक जवळपास 2 टक्क्यांनी खाली आला. जागतिक मागणीबाबतची अनिश्चितता आणि अमेरिकन बाजारातील कमजोरी याचा परिणाम आयटी कंपन्यांवर झाला.
त्याचबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्री वाढली. मिडकॅप निर्देशांक सुमारे 450 अंकांनी, तर स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास 160 अंकांनी घसरला.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) मात्र खरेदीचा सपाटा कायम ठेवला आहे. त्यांनी सलग चौथ्या दिवशी सुमारे 429 कोटी रुपयांची खरेदी केली. दुसरीकडे, देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी दोन दिवसांच्या खरेदीनंतर आज सुमारे 125 कोटी रुपयांची विक्री केली.
जागतिक स्तरावर अमेरिकन बाजारात डाओ आणि नॅस्डॅक निर्देशांक घसरून बंद झाले. त्यामुळे भारतीय बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. जपानचा निक्केई निर्देशांक मात्र स्थिर दिसत होता, तर GIFT निफ्टी सपाट स्थितीत व्यवहार करत होता.
कमोडिटी बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये पुन्हा तेजी दिसून आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 5,100 डॉलरच्या वर गेले, तर चांदीत सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली.
देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात जवळपास 2,000 रुपयांची वाढ झाली असून चांदी 10 हजार रुपयांपेक्षा जास्त महागली आहे. इराण-अमेरिका तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे.
दरम्यान, आज Coal India, ONGC, Hindalco आणि HUL यांसारख्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअर्सकडे लागले आहे.
तसेच RBI ने बँकांमधील ‘मिस-सेलिंग’ रोखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून 1 जुलैपासून ग्राहकाच्या संमतीशिवाय कोणतेही वित्तीय उत्पादन विकता येणार नाही. कर वसुलीच्या आघाडीवर सरकारसाठी सकारात्मक बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षातील सुमारे 80 टक्के कर संकलन फेब्रुवारीतच पूर्ण झाले आहे.













